सांगली

विटा : पक्षनिष्ठेपेक्षा लोकांच्या विकासासाठी आपण बंड केले : आमदार बाबर

निलेश पोतदार

विटा : पुढारी वृत्तसेवा पक्षनिष्ठेपेक्षा सुद्धा ज्या जनतेने मला निवडून दिले त्या लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण बंड केले असा दावा शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांनी केला आहे.

वेजेगाव (ता खानापूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमिपूजन आमदार बाबर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, सरपंच चंपाताई गुरव, युवा नेते प्रकाश बागल, विकास चव्हाण, डॉ अनिल लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते मनोज देवकर आदी प्रमुख उपस्थित होते.

आमदार बाबर म्हणाले, मी १९९० साली विधानसभेची निवडणूक लढवली. त्यावेळी गावात रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या लोकांनी दोन रुपये, पाच रुपये जमा करून मला निवडणूक खर्चासाठी दिले. आमदार झाल्यानंतर मी विचार केला, ज्यांचे माझ्याकडे कुठलेही काम नाही, ज्यांनी मला कदाचित पाहिलेही नसेल, त्यांच्या ताकदीवर मी विधान सभेत पोहोचलो. या लोकांसाठी मी काय करू शकतो, याचा विचार करूनच मी शेतीच्या पाण्यासाठी टेंभू योजनेचा प्रश्न सोडविला आणि मतदारसंघात पाणी आल्यामुळे आता परिवर्तन दिसून येत आहे.

आता पाणी आले तरी मात्र प्रश्न अजून संपलेले नाहीत. विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी सबस्टेशन वाढविणे गरजेचे आहे. तसेच २२ सबस्टेशन आता सौरऊर्जेवर जोडली जाणार आहेत. खानापूर तालुक्यातील गाव आणि लेंगरे या दोन्ही रस्त्यांचे आगामी काळात राज्य महामार्गात रूपांतर करण्यात येईल, असेही आमदार बाबर यांनी सांगितले. यावेळी मनोज देवकर म्हणाले, केंद्रात किंवा राज्यात येणारे प्रत्येक सरकार मागच्या सरकारने हे केले नाही, ते केले नाही असे म्हणत असते. सध्याची चर्चा सुरू आहे ५० खोके वगैरे, पण वेजेगावकरांना खोके नवीन नाहीत. आमदार बाबर यांनी या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी सहा खोके दिलेत. परवा खासदार संजय राऊत म्हणाले, पुढचा आमदार शिवसेनेचाच होईल. मलापण खात्री आहे असे प्रत्येक गावात जर सहा-सहा खोके दिले, तर पुढचे आमदार अनिल बाबर हेच होतील. आमदारांनी स्वतः लक्ष घालून विटा ते वेजेगाव रस्ता तेवढा तातडीने दुरुस्त करून द्यावा अशी अपेक्षाही देवकर यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT