विटा : बांधकाम अपूर्ण असताना विटा पालिकेची बोगस कागदपत्रे तयार करून तळमजल्यावरचे दोन गाळे विकून तब्बल 21 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना 28 जून 2023 रोजी घडली. याप्रकरणी सोमवार, दि. 22 रोजी विटा पोलिस ठाण्यात विक्रम केरू पवार आणि सुदर्शन शिरीष म्हेत्रे (दोघेही रा. विटा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विमा व्यावसायिक आशिष रवींद्र दिवटे यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत विटा पोलिसांनी सांगितले की, आशिष दिवटे यांना विक्रम पवार आणि सुदर्शन म्हेत्रे यांनी विट्यातील जमीन सिटी सर्व्हे नंबर 1603 मध्ये आम्ही व्यापारी गाळे आणि मोठे अपार्टमेंट बांधून ही जागा आम्ही विकसित करणार आहोत, असे सांगितले. तसेच त्यादृष्टीने संबंधित जागेवरील इमारतीचा बांधकाम परवाना मंजुरी आदेश, प्रारंभपत्र तसेच बांधकाम पूर्णत्वाचा विटा पालिकेचा दाखला बनावट तयार करून तो खरेदीपत्राला जोडला आणि विकसन करारानुसार बांधकाम पूर्ण झाल्यानंतर देण्यात येणारे तळमजल्यावरचे दक्षिण बाजूचे दोन गाळे 21 लाख 80 हजार रुपयांना विकले. त्यासाठी 28 जून 2023 रोजी विक्रीचे खरेदीपत्र विट्याच्या दस्त नोंदणी (रजिस्टर ऑफिस) कार्यालयात नोंदविले. मात्र अशी कोणतीही कागदपत्रे विटा पालिकेने संबंधित विक्रम पवार आणि सुदर्शन म्हेत्रे यांना दिलेलीच नाहीत, असे दिवटे यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे पवार आणि म्हेत्रे या दोघांनी आपली 21 लाख 80 हजार रुपयांची तसेच महाराष्ट्र शासनाची फसवणूक केली आहे, असे अशिष दिवटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.