

सांगली : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास आज मंगळवार,दि. 23 डिसेंबरपासून प्रारंभ होत आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरू होत आहे. निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. राजकीय हालचालींनाही गती आली आहे. महायुतीतील संभाव्य बंडखोरीवर महाविकास आघाडीचे लक्ष आहे. त्यामुळे अर्ज दाखल करण्याच्या कालावधीच्या अंतिम टप्प्यात पक्षांची उमेदवारी यादी जाहीर होईल, असे चित्र स्पष्ट होत आहे.
नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर झाला आहे. आता महापालिका निवडणुकीचा फीव्हर वाढला आहे. उमेदवारी अर्ज देण्याचा कालावधी दि. 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर सकाळी 11 ते दुपारी 3 व दि. 30 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत आहे. गुरुवार, दि. 25 डिसेंबर, रविवार, दि. 28 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दिले जाणार नाहीत. दरम्यान, उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचा कालावधी दि. 23 डिसेंबर ते दि. 30 डिसेंबर सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत आहे. उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध होतील. ते अर्ज ऑफलाईन भरायचे आहेत. उमेदवारी अर्जांची छाननी दि. 31 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक दि. 2 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 ते दु. 3 पर्यंत आहे.
मतदान जागृती मोहिमेत 170 शाळांचा सहभाग
महापालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवणे आणि लोकशाहीचा पाया अधिक बळकट करणे या उद्देशाने सोमवारी शहरात मतदान जनजागृती मोहीम उत्साहात राबविण्यात आली. या उपक्रमात 170 शाळांमधील सुमारे 45 हजार विद्यार्थी तसेच 2 हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. पालकांना मतदानासाठी प्रेरित करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी सामूहिक शपथ घेतली. वयाची अठरा वर्षे पूर्ण करून प्रथमच मतदानाचा अधिकार मिळालेल्या नवमतदारांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सामूहिक शपथविधीचे आयोजन करण्यात आले होते. मतदान हा केवळ हक्क नसून कर्तव्य आहे, असे आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगितले.
दिव्यांग मतदारांसाठी मदत कक्ष, हेल्पलाईन
दिव्यांग मतदारांना मतदान प्रक्रिया अधिक सुलभ, सुरक्षित आणि सन्मानपूर्वक पार पाडता यावी, यासाठी महानगरपालिकेत स्वतंत्र दिव्यांग मदत कक्ष स्थापन केला आहे. दिव्यांग मतदारांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी हा कक्ष सतत कार्यरत राहणार असून, त्याद्वारे मतदान प्रक्रियेतील अडथळे दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विशेष हेल्पलाईन सेवाही सुरू करण्यात आली आहे. हेल्पलाईन संपर्क क्रमांक: 0233-2329188 हा आहे. ही सेवा वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आहे.