Bangladesh Garment Import Restrictions Opportunity for India's Business Growth
विटा : विजय लाळे
बांगलादेशच्या वस्त्रोत्पादन आयातीवर लावलेल्या निर्बंधांमुळे भारताला १ ते २ हजार कोटी रुपयांच्या व्यवसायवृद्धीची संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे आता हे निर्बंध कायम ठेवावेत अशी मागणी राज्य यंत्रमागधारक संघटनेचे पदाधिकारी आणि विटा यंत्रमाग असोसिएशनचे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी केली आहे.
भारताच्या परराष्ट्र व्यापार महासंचलनालयाने (डीजीएफटी) १७ मे २०२५ रोजी एका अधिसूचनेद्वारा बांगलादेशातून भारतात आणि भारत मार्गे इतर देशात होत असलेल्या निर्यातीवर निर्बंध जारी केले आहेत. याचा भारतीय वस्त्रोद्योगावर काय परिणाम होईल? याबाबत राज्य यंत्रमागधारक संघटनेचे पदाधिकारी आणि विटा यंत्रमाग असोसीएशनचे अध्यक्ष किरण तारळेकर यांना विचारले असता ते म्हणाले की, भारत सरकारने घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे. आपल्या सरकारने आतापर्यंत बांगलादेशातून आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम आणि पश्चिम बंगाल या सिमावर्ती भागातील जमिनी मार्गाने मोठ्या प्रमाणावर आयात होत असलेल्या ११ भुसीमा चौक्या आयातीसाठी बंद केल्या आहेत.
केवळ कोलकत्ता आणि न्हावा शेवा- मुंबई या दोनच बंदराच्या माध्यमातून सागरी मार्गाद्वारे आयातीस परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे बांग्लादेशातून भारतात होत असलेल्या वस्त्रोत्पादनांच्या एकूण निर्यातीपैकी ९३ टक्के निर्यात प्रतिबंधित होत आहे. त्यामुळे जमिनी मार्गाने कमी वाहतूक खर्चात जलद गतीने भारतात होत असलेली आयात नियंत्रित होणार असल्याचा फायदा भारतातील वस्त्रोद्योगास होणार आहे.
त्यामुळे देशातील सर्व वस्त्रोद्योग संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. जागतिकीकरणानंतरच्या नियमांमुळे बांगलादेशातला मुक्त व्यापार कराराअंतर्गत शून्य टक्के निर्यात कराने माल भारतात पाठवण्याची मुभा मिळाली होती. बांगलादेशाची वस्त्रउत्पादनांची क्षमता फारशी मोठी नसल्याने भारतातील वस्त्रोद्योगास सुरुवातीला याचा फार तोटा वाटला नाही. मात्र हळूहळू चीनने या शून्य टक्के निर्यात कराचा गैरफायदा घेण्यासाठी आपली वस्त्रउत्पादने बांग्लादेशाच्या नावाने उत्पादीत केली आणि ती बांगलादेशमार्गे भारतात प्रचंड निर्यात करण्याचा सपाटा लावला होता.
गेल्या काही वर्षांत या गैर प्रकाराचा प्रचंड फटका भारतीय वस्त्रोद्योगास बसला. या परिस्थितीकडे येथील विविध वस्त्रोद्योग संघटनांनी केंद्रांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करुन हे थांबवण्याची मागणी वारंवार केली होती. मात्र केंद्राने दुर्लक्ष केले होते. आता मात्र बांगलादेशने १३ एप्रिल २०२५ रोजी भारतीय कापूस आणि धाग्यांसह इतर काही उत्पादनांच्या आयातीवर बंदी घालून तो माल चीनमधून आयात करण्याचा निर्णय घेतला होता. यास प्रत्युत्तर म्हणून भारताने हे निर्बंध लादले आहेत ते स्वागतार्ह आहेत.
मात्र आता हे निर्बंध केवळ तात्पुरते न राहता कायमस्वरुपी राहिले तरच भारतीय वस्त्रोद्योगास याचा फायदा होणार आहे. कारण या निर्बंधामुळे बांगलादेशची किमान ६६ हजार कोटी रुपयांची निर्यात प्रभावीत होत असुन ती त्यांच्या एकूण निर्याती च्या ४०- ४२ टक्के आहे. त्यामुळे बांगलादेश हे निर्बंध उठवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करेल मात्र या निर्बंधामुळे भारतातील वस्त्रोद्योग विभागास सुमारे १ ते २ हजार कोटी रुपयांच्या व्यवसायवृद्धीची निर्माण होत असलेली संधी व व्यापक हित विचारात घेऊन केंद्राने हे निर्बंध कायम स्वरुपी ठेवावेत असेही तारळेकर यांनी म्हंटले आहे.