

सांगली : अल्पवयीन मुलीचा हात धरून तिच्याशी झोंबाझोंबी करून अश्लील वर्तन केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेसह दोघांवर लोखंडी रॉड आणि दगडाने हल्ला केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे.
या प्रकरणी शहर पोलिसांनी संशयित गणेश प्रकाश शिंदे आणि प्रकाश शिंदे (रा. वाल्मिकी आवास, जुना बुधगाव रोड) या दोघांच्या विरोधात विनयभंग, मारहाण, सुधारित बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील एका भागात राहणारी 14 वर्षीय मुलगी आणि सात वर्षीय मुलगा रविवारी खाद्यपदार्थ खाण्यासाठी बाहेर निघाले होते.
त्यावेळी संशयित गणेश याने पीडित मुलीचा पाठलाग करून तिचा हात धरला. तिच्याशी झोंबाझोंबी करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. हे सर्व अचानक घडल्याने पीडितेने भयभीत होऊन हा प्रकार नातेवाईकांना सांगितला. त्यानंतर पीडितेच्या नातेवाईक महिलेसह दोघे जाब विचारण्यासाठी संशयित गणेश शिंदे याच्या घरी गेले.
त्यावेळी संशयित गणेशने लोखंडी रॉडने फिर्यादी पुरुष व्यक्तीवर हल्ला केला. गुडघ्यावर, पायावर जोरदार हल्ला झाल्याने संबंधित व्यक्ती जखमी झाली, तर दुसरा संशयित प्रकाश शिंदे याने महिलेच्या डोक्यावर दगडाने मारहाण केली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.