सांगली

Vita Bus Accident : रेणावी घाटात दोन बसेसची समोरासमोर भीषण धडक; २ जण जागीच ठार

शाळकरी मुलांसह २८ हून अधिक जखमी

पुढारी वृत्तसेवा

Sangli Vita Renavi Ghat Bus Accident

विटा : विटा-भिवघाट रस्त्यावरील रेणावी घाटात आज संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास दोन प्रवाशी बसेसचा अत्यंत भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत २ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून २८ हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा, विशेषतः मुलींचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.

अपघात कसा झाला?

मिळालेल्या माहितीनुसार, खानापूरकडून विट्याकडे जाणारी 'विजापूर - जत - कराड मार्गे मेढा' ही एसटी बस (क्र. MH 14 BT 4270) रेणावी घाटात आली असता, चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. याच वेळी विट्याहून भिवघाटच्या दिशेने चाललेले माणिक मंडले यांच्या ताब्यातील दुसरी एसटी बस (क्र. MH 14 BT 3255) समोरून येत होती. मेढा गाडीचे नियंत्रण सुटल्याने या दोन्ही गाड्यांची रेणावी घाटात समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक एवढी भीषण होती की दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

वृद्ध पती-पत्नीचा दुर्दैवी अंत

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात ठार झालेले दोन्ही प्रवासी हे वृद्ध पती-पत्नी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्राथमिक तपासात आतापर्यंत एका महिलेचा आणि एका वृद्ध पुरुषाचा मृतांमध्ये समावेश असल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे.

रुग्णालयात उपचार सुरू

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमींपैकी ११ जणांवर विटा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ५ जण गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सांगली येथील सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले आहे. काही जखमींवर विट्यातील स्थानिक खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

"अपघातातील ११ जखमींवर आमच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून, गंभीर जखमी असलेल्या ५ प्रवाशांना पुढील तातडीच्या उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटल व विट्यातील खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे."
— डॉ. विशाल नलवडे (वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, विटा)

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक कोंडी सोडवली असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT