Shaktipeeth Highway Protest | शक्तीपीठ महामार्गाविरोधात २१ ऑगस्टला सांगलीत विराट ‘यल्गार’ मोर्चा; राजू शेट्टींचा सरकारला निर्वाणीचा इशारा

‘एक इंचही जमीन देणार नाही’, ‘मोजणीसाठी आलेल्यांना शेतात पाऊल ठेवू देणार नाही’
 Farmers Protest Sangli vs Shaktipeeth Expressway
विटा येथे शक्तीपीठ महामार्गविरोधी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी व्यापक बैठक झाली. Pudahri
Published on
Updated on

Farmers Protest Sangli vs Shaktipeeth Expressway

विटा : शक्तीपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी जाण्याबरोबरच ग्रामीण संस्कृती आणि शेती व्यवस्था उद्ध्वस्त होण्याचा धोका असल्याचा आरोप करत या प्रकल्पाविरोधातील आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात आली आहे. माजी खासदार तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली २१ ऑगस्ट रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट ‘यल्गार’ मोर्चा काढण्यात येणार आहे.

विटा येथील श्रेयस भवन येथे शक्तीपीठ महामार्गविरोधी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी व्यापक बैठक झाली. या बैठकीस राजू शेट्टी यांच्यासह दीपक लाड, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, गजानन सुतार, राजेंद्र जगताप तसेच बाधित गावांतील शेतकरी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 Farmers Protest Sangli vs Shaktipeeth Expressway
Shaktipeeth Highway Protest | बऊर येथे शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध

यावेळी राजू शेट्टी यांनी सांगितले की, २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सांगलीतील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात होईल. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात येणार आहे. या आंदोलनात माजी मंत्री, आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजीत कदम, सतेज पाटील, रोहित पवार आणि रविराज साबळे यांच्यासह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील विविध नेते सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

‘हा कोणत्याही एका पक्षाचा मोर्चा नाही’

शक्तीपीठ महामार्गाविरोधातील हा मोर्चा कोणत्याही एका राजकीय पक्षाचा नसून सांगली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांचा आवाज असल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. महामार्गासाठी सुमारे १ लाख १० हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात ४० ते ४२ हजार कोटी रुपयांत हा प्रकल्प पूर्ण होऊ शकतो, असा दावा शेट्टी यांनी केला. उर्वरित मोठ्या रकमेच्या खर्चावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत या प्रकल्पाच्या गरजेवरही सवाल केला.

शक्तीपीठ महामार्ग हा नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाला समांतर असून विद्यमान महामार्गाची क्षमता पूर्णपणे वापरली जात नसताना नवीन महामार्गाची गरज काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नव्या महामार्गामुळे सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांना भविष्यात महापुराचा धोका वाढू शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

हा प्रकल्प मोठ्या प्रमाणावर बँक कर्जावर आधारित असल्याने भविष्यात प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात टोल वसूल करून जनतेवर आर्थिक भार टाकला जाईल, अशी शक्यताही शेट्टी यांनी व्यक्त केली.

 Farmers Protest Sangli vs Shaktipeeth Expressway
Shaktipeeth Highway Protest | शक्तीपीठ महामार्गाविरोधातील मुंबई आंदोलनासाठी भाग्यनगरातून शेकडो शेतकरी कूच करणार

‘मोजणीसाठी आलेल्यांना शेतात पाऊल ठेवू देणार नाही’

शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी यापूर्वी १८ जुलै रोजी पंढरपूर येथे पायदंडी काढून पांडुरंगाला साकडे घातल्याचे सांगत, त्यानंतरही सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याची टीका शेट्टी यांनी केली.

मोजणीसाठी येणाऱ्या खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना शेतात पाऊल ठेवू दिले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. घटनादत्त अधिकारांच्या रक्षणासाठी शेतकरी आंदोलन अधिक तीव्र करतील, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

‘एक इंचही जमीन देणार नाही’

दीपक लाड यांनी सांगितले की, गेल्या चार महिन्यांपासून बाधित गावांमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात संघर्ष सुरू आहे. नेवरी येथे ‘खून लो, लेकिन खेती मत लो’ असा नारा देत शेतकऱ्यांनी रक्तदान करून निषेध नोंदविला आहे.

प्रशासनाने जबरदस्तीने जमिनीची मोजणी करण्याचा प्रयत्न केल्यास ‘रक्ताचे पाट वाहिले तरी एक इंच जमीन देणार नाही’, अशी आक्रमक भूमिका बाधित गावांतील शेतकऱ्यांनी घेतल्याचे लाड यांनी सांगितले.

दरम्यान, कडेगाव तालुक्यातून चार हजारांहून अधिक शेतकरी या मोर्चात सहभागी होतील. शेतकरी शेळ्या-मेंढ्या आणि बैलगाड्यांसह मोर्चात सहभागी होणार असल्याचे बाळासाहेब होनमाने यांनी सांगितले. त्यामुळे २१ ऑगस्टचा मोर्चा शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलनातील महत्त्वाचा टप्पा ठरण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news