सांगली

विटा बाजार समिती निवडणूक : कदम गटाच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत बिघाडी

अविनाश सुतार

विटा: विजय लाळे : 'आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास' अशी एक मराठीतील म्हण आहे. आधीच महाविकास आघाडीतल्या पक्षामध्ये एकी नसताना त्यात बाजार समितीच्या निवडणुकीत कदम गटाच्या भूमिकेमुळे बेकी झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे विटा बाजार समितीची निवडणूक भाजप, शिंदे गट आणि कदम काँग्रेस विरुद्ध उर्वरित काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी होण्याची शक्यता आहे.

बाजार समितीची निवडणूक येत्या २८ एप्रिल रोजी होत आहे. या निवडणुकीचा निकाल २९ एप्रिलला आहे. आता अर्ज माघारीसाठी अवघे काही तास उरले आहेत. खानापूर आणि कडेगाव या दोन तालुक्यांची मिळून विटा बाजार समिती बनली आहे. १८ जागांसाठी तब्बल ११५ अर्ज दाखल झाले आहेत. समितीत गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेचे विद्यमान आमदार अनिल बाबर, भाजपचे पृथ्वीराज देशमुख आणि काँग्रेसचे आमदार मोहनराव कदम यांचा संयुक्त गट सत्तेत आहे. राज्यातील नव्या राजकीय समीकरणांमुळे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर हे आता शिंदे गटात आहेत.

तर वयोमानामुळे काँग्रेसचे आमदार मोहनराव कदम यांच्या गटाचे नेतृत्व माजी मंत्री विश्वजित कदम करीत आहेत. यावेळी निवडणुकीत शिंदे गट (शिवसेना) आणि भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी समोरासमोर लढत अपेक्षित होती. परंतु, या निवडणुकीत कदम गट महाविकास आघाडीबरोबर जायला इच्छुक नसल्याचे दिसत आहे. परिणामी महाविकास आघाडीत बिघाडी होणार असल्याचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. परंतु याबाबतचा अंतिम निर्णय माजी मंत्री विश्वजित कदम घेणार आहेत. पुन्हा एकदा कदम- बाबर- देशमुख अशीच आघाडी होण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादीचे नेते व माजी सभापती अॅड. बाबासाहेब मुळीक आणि ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय विभूते, माजी आमदार सदाशिव पाटील हे विरोधी आघाडीचे नेतृत्व करतील.

कडेगाव आणि खानापूर या दोन तालुक्यातून तब्बल ११५ अर्ज वैध ठरले आहेत. अर्ज माघारीसाठी गुरुवारी (दि. २०) शेवटची मुदत आहे. इच्छुकांची संख्या जास्त असल्याने अर्ज माघारीवेळी सर्व पक्षीय नेत्यांची दमछाक होणार आहे. सर्वाधिक मतदार काँग्रेसकडे आहे. त्या खालोखाल शिंदे गट, राष्ट्रवादी, भाजप आणि ठाकरे गटाकडे मतदार आहेत.

आमदार अनिल बाबर आणि आमदार मोहनराव कदम यांची मैत्री फार जुनी आहे. अनेक कठीण प्रसंगात पक्षभेद विसरून बाबर आणि कदम यांनी एकमेकांना राजकीय मदत केलेली आहे. यावेळी महाविकास आघाडी आणि भाजप, शिंदे गट अशी लढत होण्याची शक्यता होती. अशा परिस्थितीत काँग्रेसचा कदम गट राजकीय द्विधा मनस्थितीत सापडला होता. कदम गट या निवडणुकीत शिंदे गट आणि भाजपसोबत गेल्यास त्यांना कमी जागा मिळण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT