Sangli theft News
डफळापुरात ज्वेलर्समध्ये चोरी Pudhari News Network
सांगली

डफळापुरात ज्वेलर्समध्ये चोरी

पुढारी वृत्तसेवा

जत : पुढारी वृत्तसेवा

डफळापूर (ता. जत) येथील नेहा ज्वेलर्समध्ये अज्ञात चोरट्यांनी दहा किलो चांदी, दीड लाखांचे पैंजण असे एकूण पाच लाख किमतीचे चांदीचे दागिने लंपास केले. पोलिसांनी ही माहिती दिली. घटनास्थळी विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मात्र 28 लाखांची सुमारे तीस किलो चांदी लंपास केलेली आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या पुढील कारवाईकडे लक्ष आहे.

चोरीची घटना रविवारी रात्री ते बुधवारी पहाटे सव्वातीनच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद ज्वेलर्सचे हणमंत भगवान भोसले यांनी जत पोलिसांत दिली आहे. पोलिसांनी अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी श्वानपथक, ठसेतज्ज्ञ, फॉरेन्सिक लॅब व्हॅन आदीच्या माध्यमातून तपास सुरू केला आहे.

हणमंत भोसले यांनी रविवारी रात्री साडेआठ वाजता दुकान बंद केले. दुकानापासून जवळच त्यांचे घर आहे. ते रात्री उठले होते. त्यावेळी त्यांच्या ज्वेलर्सच्या परिसरात काही व्यक्ती वावरताना त्यांनी पाहिल्या. परंतु त्या इतर काही कामासाठी फिरत असतील, असा त्यांचा समज झाला. त्यांना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास शंका आली. त्यावेळी एक व्यक्ती हातात ऐवज घेऊन पलायन करत असल्याचे दिसून आले. त्यांनी दुकानाची पाहणी केली असता, शटर उचकटून दीड लाख किमतीचे चांदीचे पैंजण, जोडव्यांची मोड आदी ऐवज चोरट्याने लंपास केल्याचे दिसले. दरम्यान, घटनास्थळी मिरज पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी पाहणी केली.

सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात

पोलिसांनी ज्वेलर्सचा परिसर व दुकानातील सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले आहे. त्याआधारे तपास सुरू आहे. तसेच अन्य तांत्रिक बाबींचा तपास सुरू आहे. चोरट्यांच्या शोधाकरिता स्थानिक गुन्हा अन्वेषण व जत पोलिस विभागाची पथके कार्यरत आहेत. चोरट्यांच्या मुसक्या लवकरच आवळू, असे पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT