गिफ्ट पडले साडेसहा लाखाला; विदेशातून ज्वेलरी पार्सल पाठवल्याचे सांगत महिलेची फसवणूक

गिफ्ट पडले साडेसहा लाखाला; विदेशातून ज्वेलरी पार्सल पाठवल्याचे सांगत महिलेची फसवणूक

पुणे; पुढारी वृत्तसेवा: कस्टम विभागातून बोलत असल्याचे भासवून विदेशातील गिफ्ट आल्याचे सांगून एका महिलेची सहा लाख 60 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मांजरी बुद्रुक येथील एका 51 वर्षीय महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार नेहा शर्मा नावाच्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 20 ते 26 ऑक्टोबर या कालावधीत घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या गृहिणी आहेत. त्यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून एका व्यक्तीसोबत ओळख झाली होती. त्याने भारतात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून फिर्यादी महिलेसोबत ओळख निर्माण केली. त्यानंतर मैत्री झाल्यानंतर विदेशातून ज्वेलरी व परदेशी चलनाचे पार्सल पाठविल्याचे सांगितले. त्यानंतर नेहा शर्मा नावाच्या महिलेने फिर्यादी महिलेला फोन करून ती कस्टम विभागातून बोलत असून, तुमचे विदेशातून पार्सल आल्याचे सांगितले.

तसेच ते पार्सल सोडवून घेण्यासाठी क्लिअरन्स, जीएसटी मनी लाँडरींग अशी विविध कारणे सांगून फिर्यादींना पैसे भरण्यास सांगितले. फिर्यादी महिलादेखील आरोपीच्या प्रलोभनाला बळी पडून त्यांनी वेळोवेळी विविध बँक खात्यांवर 6 लाख 60 हजार रुपये पाठवून दिले. मात्र, कालावधी गेल्यानंतरदेखील कोणत्याही प्रकारचे गिफ्ट आले नाही, तसेच भरलेले पैसे परत मिळाले नाहीत. त्यानंतरदेखील आरोपींकडून महिलेला पैसे भरण्यास सांगण्यात येत होते. दरम्यान, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी हडपसर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली, असे हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news