सांगली : पुढारी वृत्तसेवा
शहरातील जामवाडी परिसरात भरदिवसा अनिकेत तुकाराम हिप्परकर (वय २१) या कबड्डीपटू तरुणाचा खून झाला होता. याप्रकरणी शहर पोलिसांनी बुधवारी सहाजणांना ताब्यात घेतले. त्यातील चारजण अल्पवयीन आहेत.
मुख्य संशयितांच्या नात्यातील तरुणीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय व वाढदिवसादिवशी झालेल्या भांडणाच्या रागातून हा खून झाल्याचे स्पष्ट झाले. मुख्य सूत्रधार मंगेश ऊर्फ अवधूत संजय आरते (वय २७) आणि जय राजू कलाल (१८, रा. सांगली) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांना सात दिवसांची कोठडी सुनावली. चार संशयित अल्पवयीन असल्याने त्यांना ताब्यात घेतले.
मृत अनिकेत व मुख्य सुत्रधार मंगेश दोघेही जामवाडीतील मरगुबाई मंदिराजवळील गल्लीतले. त्यांच्यात वर्षभरापासून वाद धुमसत होता. मंगेशच्या नात्यातील तरुणीशी अनिकेतचे प्रेमसंबंध असल्याचा संशय होता.
मंगळवारी अनिकेत जीमसाठी निघाला असता पाच संशयितांनी त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला. सपासप वार करीत त्याचा खून केला. हल्लेखोर पसार झाले होते. अनिकेतवर जय कलालसह पाच जणांनी कोयत्याने हल्ला केला. पाच संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी मंगेश आरते याच्या सांगण्यावरून खून केल्याची कबुली दिली.