

मुंबई : काँग्रेस पक्षाने केलेल्या एका सर्वेक्षणात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. काँग्रेस राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरणार असून, भाजप हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावरील पक्ष ठरणार आहे.
काँग्रेसने केलेल्या या सर्वेक्षणात महाविकास आघाडीला १७० जागा मिळण्याचा अंदाज असून, महायुतीला १०० च्या जवळपास जागा मिळतील, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना लागू केल्यानंतरही या योजनेचा विशेष लाभ महायुतीला होताना दिसत नसल्याचे काँग्रेसच्या सर्वेक्षणात दिसत आहे.
काँग्रेसला सर्वांत जास्त जागा काँग्रेसने केलेल्या सर्वेक्षणात काँग्रेस पक्ष लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही सर्वात जास्त जागा जिंकेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विधानसभेला ८०-८५ जागा जिंकून काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या अंदाजानुसार, काँग्रेस पक्ष विदर्भात ४० जागा जिंकू शकतो; तर मुंबईतही काँग्रेसला १० जागा मिळतील.
दुसऱ्या क्रर्माकासाठी भाजप, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरस असेल; तर त्यानंतरच्या क्रमांकासाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात स्पर्धा पाहायला मिळू शकते. २०१४ व २०१९ या दोन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने १०० हुन अधिक जागा जिंकल्या होत्या. मात्र, यावेळेस कोणत्याच पक्षाला शंभरी ओलांडता येणार नाही. २०१९ साली १०५ जागा जिंकणारा भाजप यावेळेस ६० ते ६५ जागा जिंकू शकतो. याचा अर्थ विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा फटका भाजपला बसेल, असा अंदाज आहे. जुलैमध्ये भाजपनेही एक सर्वेक्षण केले. त्याचा तपशील ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात समोर आला. त्यानुसार भाजपला विधानसभा निवडणुकीत केवळ ५५ ते ६५ जागा मिळण्याची शक्यता आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक स्ट्राईक रेट दाखवत १० पैकी ८ जागा जिंकल्या. विधानसभा निवडणुकीतही पवार गट ५० ते ५५ जागा जिंकू शकतो, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
महाविकास आघाडीत सर्वात कमी म्हणजे ३० ते ३५ जागा ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता आहे. तसेच शिंदे गटाला ३० ते ३२ जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मुंबईत ठाकरे गटाची उत्तम कामगिरी होणार असली, तरी ठाण्यात मात्र शिंदे गट उत्तम कामगिरी करेल, असेही सर्वेक्षणात म्हटले आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही सर्वाधिक निराशाजनक होण्याची शक्यता आहे. या पक्षाला विधानसभा निवडणुकीत ८ ते ९ जागा जिंकता येतील, असा अंदाज कॉंग्रेसच्या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे.