शहरात झिकाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे File Photo
सांगली

झिकाचा गर्भावरील परिणाम अठरा आठवड्यांनंतर कळणार

झिकाचा प्रभाव गर्भवती महिला आणि लहान मुलांवर जास्त

पुढारी वृत्तसेवा

पुणे, पुढारी वृत्तसेवा : झिकाची लागण झाल्यास गर्भवतींनी अ‍ॅनॉमली स्कॅन करुन घेण्याचे आवाहन तज्ज्ञांतर्फे करण्यात आले आहे. अ‍ॅनॉमली स्कॅन गर्भधारणेच्या 18 ते 24 आठवड्यांमध्ये केले जाते. या स्कॅनमधून झिकाचा गर्भावर परिणाम झाला आहे का, हे समजते. बाळाला लागण झाली असल्यास गर्भपाताचा सल्ला दिला जातो. मात्र, आतापर्यंत भारतात एकाही झिकाबाधित महिलेकडून बाळाला लागण झालेली नाही. त्यामुळे गर्भवतींनी घाबरुन जाऊ नये, असेही नमूद करण्यात आले आहे.

शहरात आतापर्यंत झिकाचे 16 रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये 8 गर्भवतींचा समावेश आहे.

शहरात सात क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत 16 झिकाचे रुग्ण सापडले आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे रुग्णांच्या आसपासच्या परिसरामध्ये सर्वेक्षण केले जात आहे. रुग्णांच्या परिसरातील 267 गर्भवती महिला या जोखमीच्या क्षेत्रात येतात. आरोग्य विभागातर्फे 118 गर्भवतींचे रक्तनमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यापैकी आतापर्यंत 8 गर्भवतींचे रक्तनमुने झिकासाठी पॉझिटिव्ह आले आहेत. गर्भवतींच्या नाळेमधून बाळापर्यंत झिकाचा आजार पोहोचण्याची शक्यता असते. बाळापर्यंत संसर्ग पोहोचल्यास बाळाच्या डोक्याचा आकार कमी होणे, डोळयांचे व्यंग निर्माण होणे, ऐकायला कमी येणे अशी गुंतागुंत निर्माण होऊ शकते. त्यासाठी त्यांनी प्रसूती होईपर्यंत खबरदारी घेण्याची गरज असल्याचे सहायक आरोग्य अधिकरी डॉ. राजेश दिघे यांनी नमूद केले.

गर्भवती महिलेला झिका व्हायरसचा संसर्ग झाल्यास न्यूरल ट्यूब डिफेक्ट, मेंदूचा योग्य विकास न होणे, सेरेब्रल पाल्सी अशा अनेक समस्या असू शकतात. बाळाला जर मातेकडून याची लागण झाल्यास मायक्रोसेफली नावाचा बर्थ डिफेक्ट होताना दिसतो. या स्थितीमध्ये मुलाचं डोके लहान किंवा चपटे असते. यासोबतच डोळे कमकुवत होतात. बाळाला सांधेदुखीची समस्या आणि मेंदूत न्यूरॉक्सची कमतरता आणि हायपरटोनियाची समस्या जाणवू लागतात. पहिल्या तिमाहीत झिका संसर्ग झाल्यानंतर या समस्यांचा धोका सर्वाधिक असतो. त्यामुळे गर्भवती महिलंनी अशावेळी आणखी जास्त काळजी घेणे गरजेचे असते. गरोदर महिलांनी संसर्ग असलेल्या भागात प्रवास करणे टाळा. झिकाचा धोका असलेल्या भागात प्रवास करत असल्यास, तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि लक्षणे आढळताच त्वरीत वैद्यकिय सल्ला घ्या. तापासोबत डोकेदुखी किंवा स्नायू दुखत असल्यास ताबडतोब रुग्णालयात जा. या दिवसात गर्भवती महिलांनी आराम करावा तसेच हायड्रेट राहणे गरजेचे आहे.
- डॉ. प्रसाद कुलट, वरिष्ठ सल्लागार स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ

गर्भवतींनी काय काळजी घ्यावी?

  • ताजे अन्न खाणे, फळे खाणे

  • फॉलिक असिड, आयर्न या गोळयांचे सेवन करणे

  • डॉक्टरांकडे नियमितपणे तपासणी करणे

  • घरात कोठेही पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी.

  • दिवसा झोपतानाही मच्छरदाणीचा वापर करावा

सहा महिन्यांपर्यंत विषाणू सुप्तावस्थेत

एकदा झिकाचा संसर्ग होऊन गेला तरी रुग्णाच्या शरीरात त्याचा विषाणू सहा महिन्यांपर्यंत सुप्तावस्थेत राहू शकतो. अशा रुग्णाला डास चावला आणि तो दुस-याला चावला तरी त्याचा संसर्ग दुस-याला होऊ शकतो. अशा व्यक्तीबरोबर असुरक्षित लैंगिक संबंध ठेवल्यास दुस-या जोडीदाराला होऊ शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT