वंचित 1 हजार 500 हेक्टर क्षेत्रालाही टेंभूचे पाणी  Pudhari News Network
सांगली

वंचित 1 हजार 500 हेक्टर क्षेत्रालाही टेंभूचे पाणी

पुढारी वृत्तसेवा

कडेगाव : पुढारी वृत्तसेवा

कडेगाव तालुक्यातील अपशिंगे, कोतवडे, रायगाव, शाळगाव तसेच कराड तालुक्यातील शामगाव, पाचुंद येथे उंचावर असलेली 1500 हेक्टर जमीन सिंचनाखाली येण्यासाठी टेंभू योजनेच्या माध्यमातून पाणी उपलब्ध होण्यासाठीही सर्वेक्षण झाले आहे. याबाबतचा प्रस्ताव कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून मान्यतेसाठी शासनाकडे सादर करण्यात आला होता. याला जलसंपदा विभागाने दि. 24 सप्टेंबर रोजी मान्यता दिली आहे, ही माहिती आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी कडेगाव येथे दिली.

ते म्हणाले, या क्षेत्रास टेंभू प्रकल्पातून पाणी द्यावयाचे झाल्यास टप्पा क्रमांक 2 प्रमाणे शिवाजीनगर तलावामध्ये सोडून व तेथून 145 मीटर उचलून स्वतंत्र उपसा सिंचन योजनेद्वारे सदर गावांमधील क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यापूर्वी मी स्वतः जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हणमंत गुणाले व टेंभू योजनेचे कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेऊन वंचित लाभक्षेत्राला पाणी देण्याबाबत संबंधित प्रस्ताव तत्काळ सादर करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. यानुसार कडेगाव तालुक्यातील अपशिंगे, कोतवडे, रायगाव व शाळगाव येथील उंचावर असलेल्या 615 हेक्टर क्षेत्रास बंदिस्त पाईपद्वारे टेंभू योजनेतून पाणी उचलण्यात येऊन जमीन सिंचनाखाली येणार आहे.

लवकरच होणार कामाला सुरुवात

उंचावरील या भागात पाणी देण्यासाठीच्या प्रस्तावाला शासन मान्यता मिळाली आहे. आता पाणी देण्याची जबाबदारी कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे आली आहे. त्यानुसार लवकरच कार्यक्षेत्र सर्वेक्षण, तांत्रिक मान्यता प्रस्ताव, निविदा निघतील व प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी माहिती टेंभू योजनेचे कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार यांनी दिली.

सिंचन क्षेत्र, पाणी वापरात बदल नाही : 71.28 कोटींचा खर्च

टेंभू मूळ प्रकल्पाच्या एकूण सिंचन क्षेत्रातील झालेल्या 1500 हेक्टर क्षेत्राच्या बचतीतून व यातून उपलब्ध झालेल्या 0.41 टीएमसी पाण्यातून या क्षेत्रासाठी उपसा सिंचन योजना प्रस्तावित केली आहे. या योजनेमुळे सिंचन क्षेत्रात तसेच पाणी वापरात बदल होत नाही. या क्षेत्रासाठी उपसा सिंचन योजना करणे व वितरण व्यवस्था करणे यासाठी अंदाजे 71.28 कोटी खर्च अपक्षेत आहे, असे आमदार डॉ. कदम यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT