टेंभुच्या पाण्याने घाटमाथ्याला नवी संजीवनी; आमदार बाबर यांच्या हस्ते पाईपलाईन लोकार्पण file photo
सांगली

टेंभुच्या पाण्याने घाटमाथ्याला नवी संजीवनी; आमदार बाबर यांच्या हस्ते पाईपलाईन लोकार्पण

दुष्काळाच्या झळांनी होरपळलेल्या घाटमाथ्यावर अखेर आशेचे पाणी पोहोचले.

पुढारी वृत्तसेवा

Tembhu Water Brings New Life to the Ghatmatha Region; Pipeline Inaugurated by MLA Babar

आटपाडी : पुढारी वृत्तसेवा

दुष्काळाच्या झळांनी होरपळलेल्या घाटमाथ्यावर अखेर आशेचे पाणी पोहोचले. बलवडी (खानापूर ) येथील टेंभु उपसा सिंचन योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या पाईपलाईनचे लोकार्पण आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते आज जलपूजनाच्या मंगल वातावरणात पार पडले. पाण्याच्या प्रत्येक थेंबाला जीवन मानणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा क्षण भावनांनी ओथंबलेला ठरला.

“कोरडवाहू शेतीला आता नवा श्वास मिळणार,” असे सांगताना आमदार बाबर यांनी स्वर्गीय अनिलभाऊ बाबर यांच्या दूरदृष्टीची आठवण करून दिली. “मुख्य कालवा गावाखालून जात असला, तरी शेतापर्यंत पाणी पोहोचत नव्हते. ही वेदना ओळखून अनिलभाऊंनी ही पाईपलाईन मंजूर केली. आज त्याच स्वप्नाला पूर्णत्व मिळाले,” असे त्यांनी सांगितले.

या पाईपलाईनमुळे खरसुंडीच्या पश्चिमेकडील मोरदरा आणि जकाई दऱ्यांतील कोरडवाहू जमीन आता ओलिताखाली येणार आहे. अनेक वर्षे आभाळाकडे डोळे लावून बसणाऱ्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात हा प्रकल्प नवी पहाट घेऊन आला आहे. ज्वारी, ऊस, कापूस यांसारख्या पिकांना जीवनदायी पाणी मिळाल्याने उत्पादनवाढीसह आर्थिक सुबत्ता वाढेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

या प्रसंगी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजी पाटील,डॉ. मिनाक्षी पुजारी, चंद्रकांत पुजारी, राजक्का कटरे, विजयकुमार भांगे, नाना पुजारी, नितीन पुजारी, मंगेश पुजारी, सुभाष माळी, किरण सावकर, निलेश पोमधरणे, महादेव सावकर, विश्वास पुजारी, आबासाहेब जाधव, पंढरी थोरात, मारूती जाधव, प्रमोद सैंब यांच्यासह शेकडो शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

टेंभु योजना – दुष्काळावर मात करणारी जीवनरेषा- सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागांना दिलासा देणारी टेंभु उपसा सिंचन योजना ही आशियातील एक महत्त्वाची योजना मानली जाते. या योजनेचे ‘जनक’ म्हणून ओळखले जाणारे स्वर्गीय अनिलभाऊ बाबर यांच्या प्रयत्नातून अनेक भागांना पाणी मिळाले आहे.

खरसुंडीतील ही पाईपलाईन त्या योजनेचा विस्तार असून, घाटमाथ्यावरील शेतकऱ्यांसाठी ती खऱ्या अर्थाने जीवनरेषा ठरणार आहे. आजच्या या लोकार्पणाने फक्त पाईपलाईन सुरू झाली नाही, तर शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आशेचा नवा झरा उगम पावला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT