

शिवाजी गायकवाड
तांदुळजा : परीसरात यंदाच्या अतिवृष्टीमुळे अनेकांचे बेहाल केले आहेत. याचा सगळ्या पिकांवर परिणाम होऊन निश्चितच उत्पादन काही प्रमाणात घटल्याचे दिसत आहे. ऊस पिकावरही यावर्षीच्या पावसाचा आणि उसाचा गाळपाचा हंगाम उशिरा सुरू झाल्यामुळे परिणाम दिसून येत आहे. गाळपासाठी अधिकचा ऊस भेटेल पण उताऱ्यात घट येण्याची शक्यता अधिकच आहे.या विचारात शेतकरीही भांबावून गेला आहे.
मांजरा पट्ट्यातील तांदुळजा तसेच सारसा,टाकळगाव, गादवड ,भोसा,मसला,पिंपळगाव ,निळकंठ, कानाडी बोरगाव आदी गावातील शेत शिवारामध्ये ऊसाला तुरे आल्यामुळे सगळा शेत शिवार कापूसमय झाला असून जमिनीवर जणू पांढरे शुभ्र ढग पसरावेत, तुऱ्यांचा जणू सफेद समुद्र यावा असेच विहंगम चित्र तांदूळजा परिसरात पाहण्यास व अनुभवण्यास मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपासून थंडीमध्ये वाढ झाल्यामुळे धुके व तुऱ्यांची शेत शिवारात चादरच पसरली आहे की काय? असे दिसून येत आहे. ऊस पिकाचा कालावधी पूर्ण झाला की तुरे येऊन उत्पादनामध्ये घट होते अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये होत आहे तसेच पोसवलेल्या उसाचे वैरण म्हणजेच वाडे चांगले निघणार नसल्यामुळे त्याचा फटका पशुपालकांनाही बसणार असल्याची दाट भीती शेतकऱ्यांना भेडसावत आहे.
घटणाऱ्या वजनाच्या भीतीपोटी अनेक शेतकरी साखर कारखान्याला ऊस घालवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र कारखान्यांची अपुरी यंत्रणा व वाढलेल्या यांत्रिकीकरणामुळे शेतकरी हतबल झाला आहे. या हंगामामध्ये प्रत्येक कारखान्याची लेबर यंत्रणा कमी असल्यामुळे परिसरामध्ये हार्वेस्टिंग पाठवलेली असल्यामुळे व त्या हार्वेस्टिंगमुळे ऊस काढल्यामुळे पशु साठी त्या उसाचे वाडे हातात न येता ते जमीन दोस्त होत असते.
या अशा परिस्थितीमध्ये शेतकरी सापडला असून आपल्या पशुसाठी चारा पुरेसा मिळतो का नाही? या भीतीमध्ये परिसरातील शेतकरी वर्ग सापडला आहे.तसेच हार्वेस्टिंगच्या काढणीमध्ये उसाचे मोठ्या टनामध्ये नुकसानही होत असल्याची चर्चा ऐकून शेतकरी वर्गाला पेच पडला आहे.10001 अर्लीअर जात म्हणून ओळखली जात होती परंतु कारखानदारांनी ती जात पण यावेळेस सगळ्याच जातीमध्ये मिसळून नेण्याचे ठरवले असल्यामुळे याही उसाच्या जातीने शेतकऱ्यांना मेटाकुळीला आणले आहे.
ऊस गाळपाचा उशिराचा हंगाम व हवामानातील बदलाचा परिणाम ऊसावर झाल्याचे जाणवत आहे त्यातच ऊसाची तोड भरभर होत नसल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाले आहेत. अशातच ऊस पोसवला म्हणजेच ऊसाला तुरे आल्यामुळे वजनात मोठ्या प्रमाणात घट होते काय अशी चिंता वाटत आहे.
दत्तात्रय आणेराव, शेतकरी, तांदुळजा.