Vita Municipal Council
विटा : भयमुक्त वातावरण म्हणजे नेमके काय, हे अनुभवायचे असेल तर सर्व विटेकरांनी एकदा नगरपालिकेत यावे, असे जाहीर आवाहन आमदार सुहास बाबर यांनी केले. सोमवारी (दि.५) विटा नगरपालिकेत नूतन नगराध्यक्षा काजल म्हेत्रे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आयोजित जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी युवा नेते व जिल्हा बँकेचे संचालक तथा नगरसेवक अमोल बाबर, बाबर गटाचे आजी-माजी नगरसेवक, सोनिया बाबर, शीतल बाबर, शरद काका बाबर, अविनाश बाबर, हेमंत बाबर यांच्यासह पदाधिकारी व मोठ्या संख्येने विटेकर नागरिक उपस्थित होते.
आमदार बाबर म्हणाले, विटा नगरपालिकेतील आजचा हा पहिलाच कार्यक्रम आहे की ज्यासाठी शहरातील हातगाडे बंद करण्यात आले नाहीत. यापूर्वी ज्या हातगाड्यांचे पुनर्वसन करायचे आहे, त्या व्यावसायिकांशी बैठक घेऊन स्पष्ट सांगण्यात आले आहे की, यापुढे कोणाच्याही मनात भीती किंवा शंका राहणार नाही. ‘तुम्ही आम्हाला मत दिले नाहीत मग आमचे काय?’ अशी भावना ठेवू नका. तुमच्यासाठी दोन जागा दाखवू, त्यातील सोयीची जागा निवडा आणि तेथेच गाडा लावा. मत दिले असो किंवा नसो, प्रत्येकाचे काम करणे हीच आमची भूमिका आहे. त्यामुळेच आज दोन ठिकाणांवरून सुरू झालेला प्रवास दहा-बारा वर्षांत २२ ठिकाणांपर्यंत पोहोचला आहे.
प्रत्येक प्रभागात महिन्यातून एकदा नागरिकांच्या प्रश्नांसाठी बैठक घेण्याच्या सूचना देताना त्यांनी सांगितले की, त्या कामांचा पाठपुरावा करण्यासाठी पालिकेतील एक नोडल अधिकारी नेमण्यात यावा. नगरसेवकांनी लोकांसाठी सतत उपलब्ध राहिले पाहिजे. तसेच पालिकेतील कंत्राटी व कायमस्वरूपी अधिकाऱ्यांनी नागरिकांकडून तक्रारी येणार नाहीत, असे वर्तन करावे. पालिकेत पैसे मागितल्याची तक्रार आल्यास थेट कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. ज्यांना हे शक्य वाटत नसेल, त्यांनी आत्ताच सांगावे; आचारसंहिता संपल्यानंतर त्यांची त्यांच्या सोयीच्या ठिकाणी बदली केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रशासन आणि पदाधिकारी हीच नगरपालिकेची दोन चाके असून त्यांच्याच जोरावर पुढे जायचे आहे, असे सांगत आमदार बाबर म्हणाले की, अधिकाऱ्यांचा मान राखावा, मात्र त्यांच्यावर आवश्यक ते नियंत्रणही असले पाहिजे. नगरसेवकांचे नगरपालिकेशी भावनिक नाते निर्माण झाले तरच ही संस्था आपली वाटेल. आपण सामान्य जनतेसाठी काम करतो, तसेच ही सत्ता येण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले आहेत त्यांचे आपण ऋणी आहोत, ही भावना कायम मनात ठेवा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रम अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला. नगराध्यक्षा काजल म्हेत्रे यांच्या दालनात दिवंगत आमदार अनिल बाबर यांची प्रतिमा लावण्यात आली होती. यावेळी आमदार सुहास बाबर म्हणाले की, जरी सर्वजण नगराध्यक्षांना ‘ताई’ म्हणत असले, तरी मी त्यांना ‘काकी’ म्हणतो, कारण त्यांच्या चेहऱ्यात अनिल बाबर यांचे साम्य दिसते. हे शब्द ऐकताच उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
तसेच, “आज भाऊ आपल्यात नाहीत, पण ते या कार्यक्रमात उपस्थित असल्याची भावना निर्माण व्हावी म्हणून मी आज त्यांचाच ड्रेस घालून आलो आहे,” असे सांगत आमदार बाबर यांनी अंगावरील झब्बा उचलून दाखवला. त्या क्षणी सभागृहात काही काळ भावनिक शांतता पसरली आणि उपस्थित नागरिक गहिवरून गेले.