

MLA Babar on governance
विटा : प्रशासन आणि राजकीय मंडळी ही रथाची दोन चाकं आहेत एक जरी खराब असेल तर संघर्ष होतो, कामे व्हायला थोडा त्रास होतो. पण इथले अधिकारी सकारात्मक मानसिकतेचे आहेत अशा शब्दात आमदार सुहास बाबर यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे कौतुक केले.
मुख्यमंत्री शंभर दिवस विशेष कार्यालयीन काम काज मोहिमे अंतर्गत विट्यात महसूल विभागाच्या वतीने सामाजिकदृष्ट्या मागास वर्गीय तसेच दुर्लक्षित घटकांना जातीच्या दाखले देण्यात आले. या दाखल्यांचे वाटप आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रांताधिकारी डॉ विक्रमसिंह बांदल, तहसीलदार योगेश टोम्पे, नायब तहसीलदार अभिजीत हजारे यांच्यासह मंडल अधिकारी तलाठी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थित होते.
यावेळी आमदार बाबर म्हणाले,देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच या मंडळींना शासनाच्यावतीने दाखला देऊन अधिकृत केले जात आहे. यात अनेक असे दुर्लक्षित घटक आहेत जे रोज कामावर जातात. मजुरी, रोजंदारी किंवा काम उद्योग केल्याशिवाय त्यांना दोन वेळचे अन्न मिळत नाही. यातील किती मंडळी शाळेत गेली असतील ? कुणास ठाऊक. पण त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम महसूल विभागाने केले. या दाखल्यांमुळे मोठा फायदा या लोकांना मिळणार आहे.
गेल्या अठरा वर्षाच्या राजकारणात आपण एक गोष्ट शिकलोय की, सकारात्मक मानसिकतेचे अधिकारी असले की कामे चांगली होतात. प्रशासन आणि राजकीय मंडळी ही रथाची दोन चाकं आहेत एक जरी चाक खराब असेल तर संघर्ष होतो,कामे व्हायला थोडा त्रास होतो. पण आपण सगळे तरुण आहातच पण सकारात्मक मानसिकतेचे ही आहात.
तुम्ही चांगलं केलं तर त्याचं श्रेय तुम्हाला मिळतं. पण तुम्ही वाईट केलं तर त्याचं मात्र खापर आमच्या माथ्यावर फोडलं जातं. तुमचं फिक्स आहे. पण आमचं तसं नाही. या पाच वर्षात आम्ही कसं काम करतोय त्यावर आमचं पुढचं अवलंबून असतं. त्यामुळे केवळ हे १०० दिवसच नाही , तर कायमच चांगले काम करा अशा अपेक्षा ही आमदार बाबर यांनी बोलून दाखवली.