

विटा : महिला बचत गटांच्या उत्पादन विक्रीसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म आणि उमेद मॉल मिळावा, यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही आमदार सुहास बाबर यांनी दिली.
येथील महात्मा गांधी विद्यामंदिराच्या प्रांगणात शोभाकाकी बाबर मेमोरियल फाऊंडेशन आयोजित महिला बचत गट महिलांच्या उत्पादित वस्तूंची विक्री व प्रदर्शन शोभा ग्रामीण महोत्सव, दीपावली प्रदर्शन व फूड फेस्टिव्हलचे उद्घाटन शनिवारी आमदार सुहास बाबर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्याहस्ते झाले. यावेळी बंडोपंत राजोपाध्ये, जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर, गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, डॉ. शीतल बाबर, प्रा. सोनिया बाबर, कृष्णात गायकवाड, महावीर शिंदे, विलासराव कदम, नंदकुमार पाटील, विनोद गुळवणी, उत्तमराव चोथे, वैभव म्हेत्रे, सुशांत देवकर, प्रकाश बागल, दिलीप किर्दत, अनंत माळी, राहुल शितोळे प्रमुख उपस्थित होते.
सुहास बाबर म्हणाले, महिला बचत गटांसाठी असे उपक्रम आजवर जिल्हास्तरावर होत होते. विट्यासारख्या तालुकास्तरावर हा पहिलाच प्रयत्न आहे. खानापूर तालुक्यात 1 हजार 145 बचत गट आहेत. यात 12 हजारांपेक्षा जास्त महिला आहेत. गेल्या वर्षभरात 54 कोटीचा निधी बचत गटांना दिला आहे. कमी वेळेत नियोजन करूनही मतदारसंघातील 126 बचत गटांनी या महोत्सवात सहभाग घेतला आहे. बचत गट महिलांची आणि लोकांचीही दिवाळी गोड व्हावी, या दृष्टीने हा प्रयत्न आहे.
विशाल नरवाडे म्हणाले, महिला सशक्तीकरणासाठी असे प्रयोग राबविणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात 75 टक्के महिला रक्तक्षय आजाराने त्रस्त आहेत. त्यांच्यासाठी काही विशेष उपक्रम राबविणे गरजेचे आहे. सांगली जिल्हा परिषदेसमोर कायमस्वरूपी बचतगटांसाठी निवासी विक्री केंद्र सुरू करणार आहे.
माजी जिल्हा परिषद सदस्य फिरोज शेख यांनी स्वागत केले. यावेळी माजी सभापती मनीषा बागल, विनायक देशमुख, संजय मोहिते, महेश घोरपडे, सुनील पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. धीरज भिंगारदेवे यांनी सूत्रसंचालन केले. स्वप्नाली सुर्वे यांनी आभार मानले.
शोभकाकींची आठवण
यावेळी आमदार बाबर यांनी आई शोभाकाकी आठवणींना उजाळा देत, आमच्या आईच्या नावाने जो उपक्रम आम्ही करतो, तो आमच्या दृष्टीने भावनिक विषय असतो. त्यामुळे शोभा ग्रामीण महोत्सव हा भविष्यात मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्याचा मानस आहे. महिला सक्षमीकरण करणे, ही त्यामागील आमची भूमिका आहे, असे स्पष्ट केले.