जालिंदर हुलवान
मिरज : मिरजेत गेल्या अनेक वर्षांपासून मोकाट कुत्र्यांचा उच्छाद सुरूच आहे. शहरात कुठे ना कुठे दररोज कुत्र्यांचे हल्ले होतातच. शिवाय मोकाट जनावरे बाजारात घुसण्याचेही प्रकार घडत आहेतच. त्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. महापालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी असणाऱ्या डॉग व्हॅनचे काम शून्य आहे.
शहरात गेल्या काही वर्षांपासून भटक्या कुत्र्यांचा त्रास शहरातील नागरिकांना आणि शहरात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागतो. भटक्या कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी शहरात बघायला मिळतात. गांधी चौक, शिवाजी रस्ता, मार्केट परिसर, मटण मंडई परिसर, हायस्कूल रस्ता, गुरुवार पेठ, मोमीन गल्ली, समता नगर, बेथेलहेम नगर, भारत नगर, माजी सैनिक वसाहत, मिरज एमआयडीसी रोड, रामकृष्ण पार्क यांसह विविध भागामध्ये भटकी कुत्री फिरत आहेत. या भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ही कुत्री दररोज कुणाचे तरी लचके तोडतात. दररोज कुठल्या ना कुठल्या तरी भागात या कुत्र्यांनी चावा घेतल्याचे, रुग्णालयातील नोंदीवरून दिसते.
यामध्ये लहान मुलांचे लचके कुत्र्यांनी तोडल्याच्या घटना जास्त आहेत. त्यामुळे लहान मुलांना कायमचे दिव्यांगत्व आल्याच्याही घटना आहेत. काही मुलांचा मृत्यूही झाला आहे. कुत्र्यांच्याबाबतीत नागरिक महापालिकेकडे तक्रार करतात, पण त्याकडे लक्ष दिले जात नाही. नागरिकांकडून जास्त दबाव आला, तरच काही कुत्री पकडली जातात. ती बाहेर सोडली, असे त्या कर्मचाऱ्यांकडून सांगितले जाते. पण पकडलेल्या भागातच ती कुत्री पुन्हा दिसतात. महापालिकेकडे कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी डॉग व्हॅन आहे, पण त्याचा वापर फारसा केला जात नाही. त्यामुळे या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. कुत्रा चावल्यानंतर रेबीस ही लस रुग्णाला घ्यावी लागते. या लसीची उपलब्धताही फारशी नसते.
एकीकडे कुत्र्यांचा त्रास आणि दुसरीकडे मोकाट जनावरांचाही त्रास शहरवासीयांना सतावतो आहे. मोकाट गाढवे, म्हशी, बैल अशा जनावरांचाही बंदोबस्त करण्याची गरज आहे. काही जण आपली जनावरे बाहेर सोडून देतात. दिवसभर फिरली की रात्री ती घेऊन जातात. अशा मोकाट जनावरांमुळे नागरिकांना त्रास होतो. मार्केट परिसरात किंवा आठवडा बाजारात अशी जनावरे घुसतात. त्यामुळे या जनावरांच्या हल्ल्यात अनेकजण जखमी झालेले आहेत.
डॉग व्हॅनसाठी संबंधितांना फोन केला की, ते वेळेत कधीच येत नाहीत. एखाद्या ठिकाणी आलेच, तर तेथे त्यांना कुत्री सापडत नाहीत. कुत्री सापडली नाहीत, की ज्यांनी फोन केला होता, त्यांनाच कुत्री झोपल्यानंतर फोन करण्याचा अजब सल्ला दिला जातो. अनेक वेळा तर डॉग व्हॅन आली की कुत्री तेथून पळून जातात. यावरही उपाय शोधण्याची गरज आहे.