स्मृती मानधनाने घेतली वडिलांची भेट 
सांगली

Smriti Mandhana : स्मृती मानधनाने घेतली वडिलांची भेट

श्रीनिवास मानधना यांची प्रकृती स्थिर; पलाश मुच्छलसह नातेवाईक मुंबईस परतले

पुढारी वृत्तसेवा

सांगली : हृदयविकाराचा झटका आल्याने स्मृती मानधना हिचे वडील श्रीनिवास मानधना हे सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. सोमवारी स्मृती मानधना हिने रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. दरम्यान, प्रसिद्ध दिग्दर्शक पलाश मुच्छल यांचे नातेवाईक मात्र मुंबईस परतले.

रविवारी स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचा विवाह होणार होता. परंतु स्मृती मानधना हिचे वडील श्रीनिवास मानधना यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. दरम्यान, सोमवारी दुपारी स्मृती मानधना व तिच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात जाऊन श्रीनिवास मानधना यांची भेट घेतली. वडिलांची तब्येत ठीक नसल्यामुळे स्मृती हिने तिचा विवाह पुढे ढकलला आहे. त्यामुळे पलाश मुच्छल व त्यांचे नातेवाईक रविवारी रात्री मुंबई व इंदोरला परतले. दरम्यान, स्मृती मानधना हिने वडिलांची तब्येत पूर्णपणे बरी होत नाही, तोपर्यंत लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दोघांचा विवाह अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला आहे.

विवाह पुढे ढकलण्याचा निर्णय

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नासाठी आलेले सर्व नातेवाईक रविवारी रात्रीच परतले. मानधना आणि मुच्छल कुटुंबाकडून लग्नाची जोरदार तयारी करण्यात आली होती. परंतु लग्नकार्यात ऐनवेळी विघ्न आल्याने हा विवाह पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे देशभरातून सांगलीत आलेल्या नातेवाईकांनी रविवारीच परतीचा रस्ता धरला.

महिला क्रिकेटपटू मात्र सांगलीतच

स्मृती मानधना हिच्या लग्नासाठी महिला क्रिकेटपटू जेमीमा रॉड्रिग्ज, श्रेयांका पाटील, राधा यादव, अरुंधती रेड्डी आणि शेफाली वर्मा या आल्या होत्या. स्मृतीचा विवाह पुढे ढकलण्यात आला असला तरी, यापैकी काही क्रिकेटपटू स्मृतीसोबत अद्याप सांगलीतच आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT