

महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये सलग तीन सामन्यांमध्ये अपयशी ठरल्यानंतर, स्मृती मानधनाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात इतिहास रचला. यासह तिने एक जागतिक विक्रमाची नोंद केली.
महिला क्रिकेटच्या ५२ वर्षांच्या इतिहासात आजवर कोणत्याही फलंदाजाला ही अद्वितीय कामगिरी करता आली नव्हती. परंतु, मानधना आता अशी कामगिरी करणारी पहिली महिला फलंदाज ठरली आहे. महिला क्रिकेटच्या या प्रदीर्घ काळात सुमारे १४०० खेळाडूंनी सहभाग घेतला, परंतु कोणालाही हा टप्पा गाठता आला नाही.
एका कॅलेंडर वर्षात १००० एकदिवसीय धावा पूर्ण करणारी स्मृती मानधना जगातील पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. यापूर्वी, जागतिक क्रिकेटमध्ये कोणत्याही महिला खेळाडूला हे यश संपादन करता आले नव्हते. मात्र, आता मानधनाने ही महत्त्वाची उपलब्धी आपल्या नावावर केली आहे. बातमी लिहीपर्यंत मानधना ५४ चेंडूंमध्ये ६२ धावांवर फलंदाजी करत होती.
मानधनाने २०२५ या वर्षात आतापर्यंत १८ सामन्यांमध्ये १०३१ धावा केल्या आहेत. यापूर्वी, ऑस्ट्रेलियाच्या बीजे क्लार्कने १९९७ मध्ये ९७० धावा केल्या होत्या. मानधनाने आतापर्यंत ५९.६४ इतका उत्कृष्ट सरासरीने धावा फटकावल्या आहेत. तिच्या बॅटमधून यंदा ४ शतके आणि ३ अर्धशतकी खेळी पाहायला मिळाल्या आहेत.
तिच्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या एल. वोल्वार्डटचा क्रमांक लागतो. तिने १८ सामन्यांत ८८२ धावा केल्या होत्या. तसेच, न्यूझीलंडच्या डी. ए. हॉकलेने १९९७ मध्ये १६ सामन्यांत ८८० आणि दक्षिण आफ्रिकेच्या ए. ई. सॅटरथ्वेटने २०१६ मध्ये १५ सामन्यांत ८५३ धावा केल्या आहेत.