सांगली: भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि गायक पलाश मुच्छल यांचा विवाह सोहळा तूर्तास अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. लग्नाच्या पूर्वसंध्येलाच स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते, ज्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, या घटनेनंतर स्मृतीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून हळदी, मेहंदीसह लग्नाच्या सोहळ्याचे सर्व फोटो आणि व्हिडीओ डिलीट केले आहेत.
स्मृती मानधनाचे वडील रुग्णालयात दाखल झाल्यानंतर, परिस्थिती अधिक गंभीर झाली. कारण, दुसऱ्याच दिवशी पलाश मुच्छल यालाही सांगली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला दोघांच्याही प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात होती. पलाशची आई अमिता मुच्छल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पलाशला आता मुंबईत आणण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे व तो घरी विश्रांती घेत आहेत.
इंस्टाग्रामवरील फोटो गायब!
आपले वैयक्तिक आयुष्य नेहमीच प्रसिद्धीपासून दूर ठेवणारी स्मृती गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत होती. पण, आता तिने सर्व फोटो डिलीट केले आहेत.
लग्नाचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या चाहत्यांनी या निर्णयावर सहानुभूती दर्शवली असून, त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्मृती आणि तिच्या कुटुंबाला आधार दिला आहे.
पलक मुच्छलची भावनिक पोस्ट
पलाशची बहीण आणि गायिका पलक मुच्छल हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने लिहिले आहे की, "स्मृतीच्या वडिलांच्या आरोग्याच्या कारणामुळे पलाश आणि स्मृतीचे लग्न थांबवण्यात आले आहे. या कठीण काळात कुटुंबाच्या खासगीपणाचा मान राखण्याची आम्ही तुम्हा सर्वांना विनंती करतो."
टीम इंडियाच्या या खेळाडू होत्या उपस्थित
स्मृती आणि पलाश यांचा विवाह सोहळा रविवारी एका खासगी समारंभात होणार होता. या सोहळ्याला भारतीय महिला क्रिकेट संघातील जेमिमा रॉड्रिग्स, राधा यादव, शेफाली वर्मा, अरुंधती रेड्डी, शिवाली शिंदे आणि रिचा घोष यांसारख्या अनेक खेळाडू उपस्थित होत्या. हळदी समारंभात स्मृतीचा सहकारी खेळाडूंसोबत डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.