

लखनौ; वृत्तसंस्था : आजपासून सुरू होणार्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेत किदाम्बी श्रीकांत आणि एच. एस. प्रणॉय यांच्यावर मुख्य लक्ष केंद्रित असेल. या दिग्गज खेळाडूंना युवा खेळाडूंकडून कडवे आव्हान मिळणार का, याची उत्सुकता असेल. 2 लाख 40 हजार डॉलर्स बक्षिसाच्या या स्पर्धेतून यूएस ओपन विजेता आयुष शेट्टीने ऐनवेळी माघार घेतली आहे.
माजी विजेत्या श्रीकांतला मलेशिया मास्टर्समध्ये उपविजेतेपदासह जवळपास सूर सापडला होता. पण, नंतर तो फॉर्म कायम राखू शकला नाही. आता मायदेशातील या स्पर्धेत विजयी सांगता करण्याची संधी त्याच्याकडे असणार आहे. ऑक्टोबरमध्ये साईड स्ट्रेनमुळे युरोपीय लेगमधून बाहेर पडलेला प्रणॉयही पुन्हा एकदा यश खेचून आणण्याच्या निर्धाराने कोर्टवर उतरेल. 2023 च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक विजेत्या प्रणॉयने गेल्या दोन आठवड्यांत जपान मास्टर्स आणि ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये भाग घेतला. मात्र, या दोन्ही वेळा त्याला दुसर्या फेरीतच बाहेर पडावे लागले.
पाचवा मानांकित श्रीकांत मेईराबा लुआंग मैसनाम विरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल, तर तिसर्या मानांकित प्रणॉयसमोर पहिल्या फेरीत कविन थंगमचे आव्हान असेल. सहाव्या मानांकित तरुण मन्नेपल्ली याच्याकडेही सर्वांचे लक्ष असेल. तो सतीश कुमार करुणाकरणशी भिडणार आहे.
गतविजेत्या महिला दुहेरीतील त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंदही येथे पुनरागमन करत आहेत. खांद्याच्या दुखापतीमुळे पाच महिन्यांच्या विश्रांतीनंतर गायत्रीने गेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुनरागमनाची तयारी केली आहेे. मिश्र दुहेरीत दुसरी मानांकित जोडी रोहन कपूर आणि ऋत्विका गड्डे शिवानी आपले मानांकन सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करतील.