शिराळा शहर : येथील बाह्यवळण रस्त्यावरील सुर्ले वस्तीवर बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी साडे पंधरा तोळे सोन्याचे दागिने व रोख पंचवीस हजार रुपये, असा वीस लाखांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना सोमवार, दि.24 रोजी घडली.
याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शिराळा येथील सुर्ले वस्तीवर तुकाराम निवृत्ती रोकडे (वय 76) हे पत्नीसह राहतात. त्यांचे पुत्र विजय रोकडे हे मुंबई येथे नोकरीस आहेत. सोमवारी दुपारी एकच्या दरम्यान तुकाराम रोकडे वीज बिल भरण्यासाठी व बाजार करण्यासाठी घरास कुलूप लाऊन गेले होते. यादरम्यान पत्नी कमल या शेतात भांगलणीसाठी गेल्या होत्या. त्यांच्यासाठी तुकाराम यांनी वर्हांड्यातील जुन्या कपड्यात कुलूपाची किल्ली ठेवली होती.
बाजार करत असताना तुकाराम यांना जावई दिलीप आनंदा पवार भेटले. ते ‘मी रात्री ट्रॅव्हल्सने मुंबईस जाणार आहे. बाजार केलेली पिशवी तुमच्या घरात ठेवतो’ असे सांगून तुकाराम यांच्या घरी गेले. यावेळी त्यांना घराचे कुलूप तोडून कोचवर टाकलेले दिसले. त्यांनी याची माहिती फोन करून तुकाराम रोकडे यांना दिली. तुकाराम रोकडे तातडीने घरी आले. त्यांनी घरामध्ये पाहिले असता कपाटातील सोन्याच्या 40 ग्रॅमच्या दोन पाटल्या, मणी मंगळसूत्र, 35 ग्रॅम वजनाचे पदक, 12 ग्रॅम वजनाचा नेकलेस, 10 व 17 ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या साखळ्या, 5 ग्रॅम वजनाची अंगठी, प्रत्येकी 3 ग्रॅम वजनाच्या 2 व 2.5 ग्रॅमच्या दोन अंगठ्या, 5 ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे टॉप्स व वेल, 4 ग्रॅम वजनाचे 2 वेल जोड, असे 15.40 तोळ्याचे दागिने व रोख पंचवीस हजार, असा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीस आले.
उपअधीक्षक अरुण पाटील, गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, निरीक्षक जंबाजी भोसले, सहायक निरीक्षक जयदीप कोळेकर यांनी घटनास्थळी भेट दिली. ठसे तज्ञांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. अधिक तपास सहायक निरीक्षक सागर वरुटे करत आहेत. याबाबत शिराळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक सागर वरुटे करत आहेत.