सांगली

सांगली : पाणी कनेक्शन सर्वेक्षण संशयाच्या भोवर्‍यात

अमृता चौगुले

सांगली : पुढारी वृत्तसेवा : महापालिका क्षेत्रात केवळ सांगली शहर व उपनगरात 22 अनधिकृत नळकनेक्शन सापडली आहेत. कुपवाड आणि मिरज येथे एकही अनधिकृत पाणी कनेक्शन सापडले नाही. कुपवाड आणि मिरजमध्ये सर्व काही आलबेल आहे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यातून पाणी कनेक्शन सर्वेक्षणच संशयाच्या भोवर्‍यात सापडले आहे.

नळपाणी ग्राहकाच्या बिलात अपहाराचा प्रकार समोर आल्यानंतर पाणी बिल घोटाळ्याचे अनेक प्रकार समोर येऊ लागले. महापालिकेच्या दप्तरी कनेक्शनची नोंद न करता पैसे घेऊन परस्पर पाणी कनेक्शन देणे, पाणी बिलाची रक्कम महापालिकेत न भरणे, ग्राहकाला पैसे भरल्याची पावती न देणे, पाणी बिल न देणे आदी काही प्रकार समोर आले. आयुक्त नितीन कापडणीस यांनी याची गंभीर दखल घेतली. कापडणीस यांनी दि. 15 रोजी पाणी कनेक्शन्सच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले. पाणीपुरवठा विभागाच्या भागलिपिकाकडून  सर्वेक्षण सुरू आहे. 24 फेब्रुवारीपर्यंत सर्वेक्षण होणार आहे.

सांगली व कुपवाडमध्ये 9 हजार 319 पाणी कनेक्शनचे सर्वेक्षण झाले आहे. त्यामध्ये सांगलीत खणभागात 6 आणि औद्योगिक वसाहतीत 1 कनेक्शन अनधिकृत आढळले. सर्वेक्षणापूर्वी सांगलीत कलानगर, घन:शामनगर, शिंदेमळा परिसरात 15 पाणी कनेक्शन अनधिकृत आढळली होती. सांगली आणि कुपवाडमध्ये 60 हजार 685 पाणी कनेक्शन आहेत. मिरजेमध्ये 25 हजारावर पाणी कनेक्शन आहेत. पाणी कनेक्शन सर्वेक्षण 24 फेब्रुवारीपर्यंत होणार आहे.

अनधिकृत आढळलेली सर्व पाणी कनेक्शन्स सांगलीतील आहेत. कुपवाड आणि मिरजेत एकही पाणी कनेक्शन अनधिकृत आढळलेले नाही. त्यामुळे सर्वेक्षणच संशयाच्या भोवर्‍यात सापडले आहे. पाणीपुरवठा विभागाच्या भाग लिपिकांकडूनच सर्वेक्षण सुरू असेल तर ते कितपत वस्तुनिष्ठपणा असेल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, पाणी कनेक्शन सर्वेक्षण त्रयस्थ यंत्रणेमार्फत करण्याची मागणी नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी केली आहे.

हे ही वाचलं का  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT