Khanapur Chikhalhol Women Farmers Protest
विटा : "आमची जमीन म्हणजे आमचा जगण्याचा आधार आहे. कोणत्याही परिस्थितीत ती हिरावून घेऊ देणार नाही. प्रसंगी जीव देऊ, पण जमीन देणार नाही," असा संतप्त आक्रोश करत शक्तिपीठ महामार्गाविरोधात चिखलहोळ येथील शेतकरी महिला हातात पेट्रोलच्या बाटल्या घेऊन रस्त्यावर उतरल्या. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाला प्रस्तावित ड्रोन मोजणी थांबवावी लागली.
खानापूर तालुक्यातील प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गासाठी सुरू असलेल्या ड्रोन सर्व्हेला दुसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांचा तीव्र विरोध कायम राहिला. नागेवाडीनंतर बुधवारी पहाटे दोन वाजल्यापासून चिखलहोळ व भाग्यनगर परिसरात सुरू झालेली ड्रोन मोजणी संतप्त शेतकरी महिलांनी रोखून धरली.
प्रशासनाकडून संभाव्य कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन पहाटे चार वाजल्यापासून भाग्यनगर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, आक्रमक शेतकरी आणि महिलांच्या निर्धारापुढे प्रशासन काही काळ हतबल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली आणि परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
आंदोलक महिलांनी सरकारच्या भूमिकेवरही तीव्र नाराजी व्यक्त केली. एकीकडे 'लाडकी बहीण' योजनेच्या माध्यमातून महिलांना आधार देण्याचे दावे केले जातात, तर दुसरीकडे त्यांच्याच उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या जमिनी महामार्गासाठी संपादित केल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. "आम्हाला लाडकी बहीण म्हणायचे आणि आमच्याच जमिनी घ्यायच्या? आम्हाला आधार द्यायचा की आमचा संसार उद्ध्वस्त करायचा?" असा संतप्त सवाल महिलांनी उपस्थित केला.
"आम्ही तुरुंगात जाण्यास तयार आहोत. प्रसंगी जीव देऊ, पण महामार्गासाठी एक इंचही जमीन देणार नाही," असा निर्धार व्यक्त करत महिलांनी 'जेल भरो' आंदोलनाचा इशारा दिला. "पोलीस आणि जेल तयार ठेवा; आम्ही घाबरणार नाही," अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
यावेळी स्थानिक आमदार आणि खासदारांच्या अनुपस्थितीबाबतही महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. निवडणुकीच्या काळात मतांसाठी येणारे लोकप्रतिनिधी संकटाच्या वेळी कुठे आहेत, असा सवाल उपस्थित करत त्यांनी मतदानाच्या अधिकाराची आठवण करून दिली. शक्तिपीठ महामार्गाचा प्रस्ताव रद्द होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
आंदोलनादरम्यान शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे ॲड. दीपक लाड यांच्या समर्थनार्थ "दीपक दादा नहीं अकेला, साथ है हमारा सब काफिला," अशा घोषणाही देण्यात आल्या.
शक्तिपीठ महामार्गामुळे सुपीक व बागायती शेती तसेच गावांच्या अस्तित्वावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. प्रशासनाने कोणत्याही परिस्थितीत महामार्गाचे काम पुढे नेण्याची भूमिका घेतल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात येत असून, त्यामुळे परिसरातील वातावरण अधिकच चिघळले आहे.