Shaktipeeth Highway Protest | जमीन मोजणीस याल, तर याद राखा!

शक्‍तिपीठ महामार्गविरोधातील विराट मोर्चात आ. सतेज पाटील यांचा इशारा
कोल्‍हापूर : शक्‍तिपीठविरोधात आयोजित सभेत नेत्‍यांनी हात उंचावून एकजुटीचे दर्शन घडविले.
कोल्‍हापूर : शक्‍तिपीठविरोधात आयोजित सभेत नेत्‍यांनी हात उंचावून एकजुटीचे दर्शन घडविले. (छाया : मिलन मकानदार)
Published on
Updated on

कोल्‍हापूर : शेतकर्‍यांना उद्‌ध्‍वस्‍त करणार्‍या व गरज नसलेल्‍या शक्‍तिपीठ महामार्गाविरोधात १२ जिल्‍ह्यांतील शेतकरी संघर्ष करीत आहेत. सक्‍तीने जमीन मोजणीस याल, तर याद राखा, जशास तसे उत्तर देण्‍यात येईल, असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला. शक्‍तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीतर्फे जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित सभेत ते बोलत होते.

आमदार पाटील म्‍हणाले, स्‍वत:च्‍या जिल्‍ह्यात महामार्ग न घेता इतर जिल्‍ह्यांचे वाटोळे करण्‍याची भूमिका मुख्‍यमं‍त्र्यांची आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी शेतकर्‍यांसाठी भूमिका घ्‍यायला हवी. शिरोलीतील एका पुलामुळे महापुराची स्‍थिती निर्माण झाली. शक्‍तिपीठ महामार्ग ११ नद्यांवरून जाणार असल्‍याने भविष्‍यात महापुराचा धोका वाढणार आहे. या महामार्गामुळे हिंदूंची जमीन जाणार नाही का? बोरवडेतील ज्‍योतिर्लिंग मंदिरासह जिल्‍ह्यातील २०० मंदिरांना फटका बसतोय, तुमचे हिंदुत्‍व कुठे गेले, असा सवाल आ. पाटील यांनी केला.

आमदार पाटील म्‍हणाले, शक्‍तिपीठसाठी एक लाख कोटी रुपये खर्चण्‍याऐवजी राज्‍यातील ५० किल्‍ल्‍यांना प्रत्‍येकी ५०० कोटी रुपये द्या, बेरोजगारांना दरमहा पाच हजार रुपये द्या, २२-२३ हजार गावांना प्रत्‍येकी एक कोटी रुपये रस्‍त्‍यासाठी द्या, सवलतीच्‍या दरात धान्‍य, गोडे तेल उपलब्‍ध करा, पेट्रोल व डिझेलवरील कर कमी करून महागाई नियंत्रणात आणा. तत्‍कालीन मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शक्‍तिपीठ रद्द केल्‍याची घोषणा केली. निवडणुका होताच पुन्‍हा प्रक्रिया सुरू केली. स्‍क्रीप्‍ट नागपुरात तयार झाली; मात्र कोल्‍हापुरात फ्‍लॉप शो झाला. १२ जिल्‍ह्यांत फ्‍लॉप शो होईल.

आमदार जयंत पाटील म्‍हणाले, गडचिरोलीतील खणिजे गोव्‍यात नेण्‍यासाठी हा उपद्‍व्‍याप आहे. सत्ताधारी आमदार, मंत्र्यांनी सडेतोड भूमिका घ्‍यावी. राजू शेट्टींवर माझा विश्‍वास आहे. मात्र, माझ्‍यावर त्‍यांचा नाही. माजी आमदार संपतबापू पवार-पाटील म्‍हणाले, शेतकर्‍यांनी एकजूट केल्‍यास सरकारला निर्णय बदलणे भाग पडेल. माजी आमदार ऋतुराज पाटील म्‍हणाले, मोर्चा हा ट्रेलर असून, २०२९ मध्‍ये शेतकरी ताकद दाखवतील. शिवसेनेचे विजय देवणे म्‍हणाले, ज्‍यांनी उद्धव ठाकरेंना फसवले ते शेतकर्‍यांना फसवणार नाहीत का? पालकमंत्र्यांनी खुर्ची साेडून शेतकर्‍यांसोबत यावे. रक्‍ताचे पाट वाहतील; पण एक इंचही जमीन देणार नाही. यावेळी संपत देसाई, सम्राट मोरे, बाळासाहेब खाडे, मनोज फराकटे, अतुल दिघे, अजित पोवार, शिवाजी मगदूम, गिरीश फोंडे यांची भाषणे झाली.

शेतकर्‍यांची थडगी बांधून विकासाचे मनोरे नकोत

शेतकरी पेटून उठला आहे. दम असेल तर संयुक्‍त मोजणीस या, असे थेट आव्‍हान देत माजी खासदार राजू शेट्टी म्‍हणाले, शेतकर्‍यांची थडगी बांधून विकासाचे मनोरे बांधू नका. जिल्‍ह्याचे वाटोळे करण्‍याचे षड्‌यंत्र आहे. शक्‍तिपीठसाठी प्रतिकिलोमीटर २५६ कोटी रुपये खर्च कसा? या महामार्गामुळे २५ लाख टन उसाला फटका बसणार आहे. या प्रकल्‍पात ६० हजार कोटी रुपये हाणण्‍याचा डाव असून, सत्ताधार्‍यांनो, तुमचा हिस्‍सा आधी ठरवून घ्‍या, नंतर भांडण नको, असा मिश्‍कील टोला लगावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news