

ऐतवडे खुर्द : विकासाच्या नावाखाली जबरदस्तीने लादल्या जाणाऱ्या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाविरोधात वाळवा तालुक्यातील महिला आता आक्रमक झाल्या आहेत. प्रसंगी प्राण देऊ, पण आमच्या पिढ्यान् पिढ्यांची सुपीक शेतजमीन देणार नाही, असा इशारा देत ऐतवडे खुर्द आणि कामेरी परिसरातील हजारो महिलांनी शनिवारी सायंकाळी काढलेल्या जागृती मोर्चाने संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
महिला रस्त्यावर उतरल्यामुळे मोर्चाला महत्त्व आले होते. सारे गावकरी या मोर्चात निर्धाराने सहभागी झाले होते. युवा वर्गाचा सहभाग लक्षणीय होता. जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या मोर्चाची सुरुवात झाली.
हा मोर्चा कामेरी, येडेनिपाणी मार्गे ऐतवडे खुर्द येथे आंदोलक महिलांचा ताफा मुख्य रस्त्यावरून पुढे सरकला. या महामार्गासाठी एकट्या ऐतवडे खुर्द परिसरातील तब्बल 182 एकर सुपीक, बागायती जमीन संपादित केली जाणार आहे. कोणाचीही मागणी नसताना हा महामार्ग शेतकऱ्यांवर लादला जात असल्याचा आरोप महिलांनी केला. काहीही करून शक्तिपीठ होऊ देणार नाही. त्यासाठी तीव्र आंदोलन यापुढे हाती घेतले जाईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी उपसरपंच मनीषा पाटील, माजी जि. प. सदस्य छाया पाटीलसह महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
जुनेखेड ग्रामसभेत ठराव मंजूर
बळीराजाला भूमिहीन, अल्प भूधारक व दुर्बल करणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा तीव्र विरोध आहे, असे मत वाळवा तालुक्यातील जुनेखेड ग्रामपंचायतीच्यावतीने आयोजित ग्रामसभेत ग्रामस्थांनी व्यक्त केले. जुनेखेड (ता. वाळवा) येथील ग्रामपंचायतीची सभा नुकतीच सरपंच प्रियांका पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ग्रामस्थांनी शक्तिपीठ विरोधाचा ठराव मंजूर केला. जाणकार ग्रामस्थांनी आपली मते ठामपणे मांडली आणि या महामार्गाला तीव्र विरोध दर्शवला. रोखठोक भूमिकेमुळे ग्रामसभेत निर्धाराचे वातावरण तयार झाले होते.
सरपंच प्रियांका पाटील म्हणाल्या, जुनेखेड ग्रामस्थांच्या जमिनी, शेती हिरावून घेणारा हा मार्ग शेतकरी वर्गाला नको आहे. चांगल्या कसदार जमिनी महामार्गाला गेल्यास जुनेखेड येथील कृषी जीवन उद्ध्वस्त होईल. तसेच महापुराचे संकट अधिक गडद होईल.
शेतकरी संघटनेचे प्रताप पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी दिलीप पाटील व जयकर पाटील यांनी देखील शक्तीपीठ विरोधात मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सदस्य नितीन पाटील, अरुणा पाटील, धनाजी पाटील, विमल पवार, सोनाली कोळगे, जोत्स्ना पाटील यांच्यासह अन्य अनेक ग्रामस्थांनी चर्चेत सहभागी होऊन शक्तिपीठ महामार्गास निषेध नोंदवला. यावेळी सहदेव पाटील, बाबासाहेब पाटील, विजय पाटील, धनाजी पवार, रमेश पाटील, दीपक पाटील, नितीन संभाजी पाटील, विनायक जाधव उपस्थित होते.