विटा - बालिकेच्या मृत्यूनंतर विटा ग्रामीण रुग्णालयामध्ये पालक आणि नातेवाईकांचा आक्रोश Pudhari
सांगली

Vita Child Death | विटा ग्रामीण रुग्णालयात लसीकरणानंतर ४ महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू; कुटुंबीयांचा निष्काळजीपणाचा आरोप

लसीकरणानंतर बालिकेला ताप, रात्रभर अस्वस्थ

पुढारी वृत्तसेवा

Vita Child Death After Vaccination

विटा : विटा ग्रामीण रुग्णालयात लसीकरण झाल्यानंतर काही तासांतच चार महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणावर गंभीर आरोप केले आहेत.

सोमवारी दुपारी सोना तिरुपती राठोड या चार महिन्यांच्या बालिकेला लसीकरणासाठी विटा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. तेथे तिला पेंटा-१, आयपीव्ही, रोटा-१ आणि पोलिओ या लसींचे डोस देण्यात आले. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, लसीकरणानंतर बालिकेला ताप आला होता. रात्रभर ती अस्वस्थ होती आणि मंगळवारी पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.

बालिकेचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीयांनी मृतदेह घेऊन ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. यावेळी नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात संताप व्यक्त करत प्रशासनाविरोधात निषेध नोंदविला. त्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित दिवशी सुमारे २५ बालकांचे लसीकरण करण्यात आले होते. घटनेनंतर प्रशासनाने तत्काळ सर्व बालकांच्या प्रकृतीची चौकशी करणे अपेक्षित होते; मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

तसेच, बालिकेच्या मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट व्हावे यासाठी तातडीने उत्तरीय तपासणी (पोस्टमॉर्टम) करण्याची मागणीही कुटुंबीयांनी केली आहे.

याबाबत विटा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रागिणी पवार यांनी सांगितले की, संबंधित बालिकेला सोमवारी सकाळी सुमारे १० वाजता लस देण्यात आली होती. त्यावेळी तिची प्रकृती सामान्य होती. त्याच दिवशी लसीकरण झालेल्या इतर बालकांमध्ये कोणतीही गंभीर प्रतिकूल प्रतिक्रिया आढळून आलेली नाही.

दरम्यान, आणखी दोन बालकांना ताप आल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यांच्यावर आवश्यक उपचार करून घरी सोडण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

घटनेची गंभीर दखल घेत संबंधित बालिकेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सांगली येथील मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला आहे. तसेच, लसीकरण झालेल्या इतर बालकांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

बालिकेच्या मृत्यूचे नेमके कारण पोस्टमॉर्टम अहवालानंतरच स्पष्ट होणार असून, आवश्यक असल्यास व्हिसेरा तपासणीचा अहवाल आल्यानंतर अधिक माहिती समोर येईल, असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT