

विटा : विट्यात भोंदू अशोक खरात सारख्या प्रकरणाचा जणू पुढचा अध्याय पार पडत आहे. तू मागच्या जन्मी नागीन होतीस, हा नाग होता. तुमच्या दोघांचे लग्न लावण्यासाठीच या जन्मी तुमचा जन्म झाला आहे. असे म्हणून एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करणे आणि तसा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देणे आणि पूजा हवनाच्या नावाखाली तब्बल पाच लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
या प्रकरणी विट्यातील महेश मोहन बाबर (रा. भवानी माळ, विटा), संकेत संदीप निकम (रा. घोगाव, ता. पलूस, जि. सांगली) आणि सूरज उपाध्ये या तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, पोक्सो (लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा) आणि महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट,अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध कायदा अधिनियम २०१३ कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विट्यातल्या पाटील वस्ती परिसरात गेल्या काही काळापासून 'कडेश्वर धाम अध्यात्म संस्था' नावाच्या आश्रमात अनेक गैरप्रकार सुरू आहेत. हा आश्रम विट्यातील महेश मोहन बाबर, मूळचा घोगावचा पण गेल्या काही काळापासून विट्यात वास्तव्यास असलेला संकेत संदीप निकम आणि सूरज उपाध्ये हे तिघे चालवतात. हे तिघे स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे सांगून तेथे येणाऱ्या लोकांची आर्थिक, शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या फसवणूक करतात अशा तक्रारी चर्चिल्या जात होत्या. मागच्या आठवड्यात एका महिलेच्या तक्रारीवरून या तिघांना विटा पोलिसांनी अटक करून न्यायालयापुढे हजर केले होते.
त्यांची पोलीस कोठडी आज सोमवारपर्यंत होती. त्यातच आता हा अल्पवयीन मुलीवर अत्याचार,आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत विटा पोलिसांनी सांगितले की,१ जून २०२४ ते १२ मे २०२६ या काळात पीडित मुलीला शारीरिक आणि पित्ता शयाचा त्रास होता. याचाच गैरफायदा घेत संशयित आरोपी महेश बाबर आणि संकेत निकम यांनी पीडितेला, "संकेत निकम हा शंकर बाबा, महाकाल, बाळूमामा आणि चिले महाराज यांचा अवतार आहे," असे भासवले. तसेच पीडित मुलीच्या शरीरात अंबाबाई देवीचा संचार येतो, असे सांगून तिला पूजा आणि हवन करण्यास भाग पाडले.
अंधश्रद्धेचा कळस गाठत आरोपींनी पीडितेला, "तू मागच्या जन्मी ची नागिन होतीस आणि संकेत बाबा हा नाग होता. तुमच्या दोघांचे लग्न लावण्यासाठीच या जन्मी तुमचा जन्म झाला आहे," असे सांगितले. असे भोंदूगिरीच्या जाळ्यात ओढून आरोपी संकेत निकम याने विटा येथील एका खोलीवर अल्पवयीन पीडित मुलीवर जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेवून अत्याचार केला. शिवाय संशयित आरोपी सूरज उपाध्ये याने पीडित मुलीला तोंड न उघडण्याची धमकी दिली. "संकेत बाबा सर्व काही बघत आहेत, जर कोणाला काही सांगितले तर तुझे व्हिडिओ व्हायरल करेन," अशी धमकी ही दिली. दरम्यान, पूजा आणि हवनाच्या नावाखाली संशयित आरोपी महेश बाबर आणि संकेत निकम यांनी पीडित मुलीच्या वडिलांकडून एकूण ४ लाख ५० हजार रुपये बँक खात्यावर आणि ५० हजार रुपये रोख रक्कम घेतली.
हा सर्व मानसिक, शारीरिक आणि आर्थिक छळ असह्य झाल्यानंतर पीडितेने अखेर विटा पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर फिर्याद दिली. तक्रारीवरून आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६४, ६४(२)(एम), ३१८ (४), ३५१(२), ३(५) सह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) कलम ४, आणि महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा २०१३ च्या कलम ३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. विट्याचे पोलीस उप विभागीय अधिकारी विपुल पाटील, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक पूजा महाजन या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.