आटपाडी, पुढारी वृत्तसेवा : माडगूळे येथील सौरभ, श्रीधर आणि कलावती विभुते यांनी दिलेल्या खोट्या तक्रारीवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, खोट्या गुन्ह्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत हद्दपारीचा प्रस्ताव दाखल करावा, विनयभंगप्रकरणी जामिन मिळालेल्या सौरभचा जामीन रद्द करून तुरुंगात रवानगी करावी, अशी मागणी करत आज (दि.२१) माडगुळे ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला.
माडगुळे येथील सौरभ आणि तुषार विभुते या बंधूंच्या विरोधात शेकडो स्त्री- पुरुष ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. अनेक गुन्हे दाखल असलेल्या या दोघांनी दररोज भांडण तंटे करत गावाला वेठीस धरले आहे. राजकीय पाठबळ असल्याने त्यांची मोठी हिंमत आणि दहशत आहे. अशा प्रवृत्तीच्या आणि खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या बंधुंवर कारवाई करावी. आणि जामिनावर सुटलेल्या सौरभची तुरुंगात रवानगी करावी म्हणून ग्रामस्थांनी तासभर ठिय्या दिला.
सौरभ विभुते २०१५ मधील विनयभंग गुन्ह्यात दोषी ठरल्याने न्यायालयाने त्याला नुकतीच शिक्षा सुनावली आहे. परंतु तो जामिनावर बाहेर आहे. दरम्यान, त्याच्या शिक्षेबाबतची माहिती सोशल मीडियातून गावातील एका ग्रुपवर व्हायरल झाली. या घटनेचा राग मनात धरून विभुते बंधूंनी उध्दव गंगाराम विभुते आणि त्यांची आई कलावती यांना दगडाने मारहाण केली. याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. तर याच प्रकरणी सौरभ, श्रीधर आणि मीनाक्षी विभुते यांनी उध्दव विभुते आणि त्यांची आई कलावती तसेच विनयभंग प्रकरणातील साक्षीदार असलेल्या बापुसो दत्तात्रय विभुते अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मारहाण झालेल्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल झाल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यासमोर ठाण मांडले. ग्रामस्थांनी पोलिसांना निवेदन देत गाऱ्हाणे मांडले. पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले. तपास करून कारवाई करण्याची ग्वाही दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी मोर्चा स्थगित केला.
हेही वाचा