ए. एस. ट्रेडर्स फसवणूक प्रकरण : ११०० कोटी परदेशात पाठविणार्‍या सांगलीतील नगरसेवकाला अभय का? | पुढारी

ए. एस. ट्रेडर्स फसवणूक प्रकरण : ११०० कोटी परदेशात पाठविणार्‍या सांगलीतील नगरसेवकाला अभय का?

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : ए. एस. ट्रेडर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स कंपनीत गुंतवणूकदारांनी जमा केलेली सुमारे 1100 कोटींची रक्कम हवालामार्फत परदेशात पाठविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या सांगलीतील स्वीकृत नगरसेवकाला अटक न करता केवळ चौकशी करून त्याला सोडूून देण्याचा तपास अधिकार्‍यांचा उद्देश काय होता, असा सवाल एल.एल.पी. कंपनीविरोधी कृती समितीने करत पोलिस महासंचालकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा ऐरणीवर आले आहे.

सुमारे तीन हजारांवर कोटींचा गैरव्यवहाराचा छडा लावून मुख्य सूत्रधारासह त्याला पाठीशी घालणार्‍या एजंटासह साथीदारांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहकार्य करणार्‍या घटकांची सखोल चौकशी करून संबंधिताविरुद्ध कारवाईची मागणी कृती समितीचे निमंत्रक व प्रमुख तक्रारदार रोहित ओतारी, विश्वजित जाधव, गौरव पाटील, महेश धनवडे यांच्यासह गुंतवणूकदारांनी पोलिस महासंचालकांकडे केली आहे.
कृती समितीच्या पदाधिकार्‍यांनी तपास अधिकार्‍यांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयित आशिष गावडेला अटक झाल्यानंतर त्याच्या चौकशीत महत्त्वाची माहिती उघडकीस आली होती. त्याच्याकडील मोबाईलमधूनही महत्त्वाच्या संभाषणाचे रेकॉर्डिंग हाती लागले होते. कंपनीच्या म्होरक्याचा विश्वासू साथीदार असलेल्या चार व्यक्तींमार्फत कंपनीची कोट्यवधीची रक्कम परदेशात पाठविण्यात आली होती. त्यात सांगलीतील एका स्वीकृत नगरसेवकाचाही मोठा सहभाग होता.

संंबंधित नगरसेवकाने हवालामार्फत सुमारे 1100 कोटींची रक्कम परदेशात पाठविल्याची माहिती आहे. या नगरसेवकाला चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेत बोलाविण्यात आले होते. मात्र, चौकशीनंतर त्याला सहिसलामत सोडून देण्यात आले. वास्तविक फसवणुकीच्या गुन्ह्यात संबंधित नगरसेवकांसह त्याच्या साथीदारांचाही सहभाग असताना त्याच्यावर अटकेची कारवाई न करता त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाला आहे, असाही आरोप कृती समितीने केला आहे.

कंपनीच्या म्होरक्यासह संचालक, एजंटाविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित कोल्हापुरातून पसार झाले होते. या काळात संबंधित नगरसेवकाने म्होरक्यासह अन्य संशयितांना पाठीशी घालून त्यांना आश्रय देण्याचा प्रयत्न केला आहे.
या कृत्याची सखोल चौकशी झाल्यास त्याच्या कारनाम्यांचा पर्दाफाश होऊ शकेल. मात्र, तपास अधिकार्‍यांनी या घटनाक्रमांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. चौकशी पथकातील अधिकार्‍यांचे सीडीआरही तपासण्यात यावेत, अशीही मागणी केली आहे.

कोल्हापुरातील माजी नगरसेवकांचेही लागेबांधे!

ए. एस. ट्रेडर्सच्या म्होरक्यांशी कोल्हापुरातील काही माजी नगरसेवक व राजकीय पक्षाच्या मंडळींचे लागेबांधे असल्याची माहिती आहे. याबाबत तपास अधिकार्‍यांना वारंवार माहिती देऊनही त्याची दखल घेण्यात आली नाही. लोहितसिंग सुभेदार याला हजर करण्यात दोन माजी नगरसेवकांच्या सहभागाची शहरात उघड चर्चा असतानाही तपास अधिकार्‍यांनी वरिष्ठांना अंधारात ठेवून मनमानी केल्याचा आरोपही कृती समितीच्या पदाधिकार्‍यांनी केला आहे. या गैरकृत्याचा पाठपुरावा करून संबंधितांना पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.

Back to top button