विटा : पुढारी वृत्तसेवा : येरळा नदीवरील चिखलहोळ येथील बंधाराचे लोखंडी बर्गे (दारे) चोरणाऱ्या सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील दोघा संशयितास विटा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून २ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अजित फुलचंद पाटील (वय २१, रा. मायणी) आणि अभिषेक सतीश कदम (वय १९, रा. शेडगेवाडी) अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणी पाटबंधारे विभागाचे शाखा धिकारी अमितकुमार प्रकाश साठे यांनी फिर्याद दिली होती.
याबाबत विटा पोलिसांनी सांगितले की, २६ ते २८ फेब्रुवारीरोजी चिखलहोळ येथील येरळा नदीवरील बंधाराचे १४ हजार किंमतीचे पाणी अडविण्यासाठीचे एकूण १४ लोखंडी बर्गे अज्ञात चोरट्यांनी पळवून नेले होते. याबाबत पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी अमितकुमार साठे यांनी फिर्याद दिली होती.
विट्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी विटा पोलिसांच्या गुन्हे प्रकटी करण पथकास तपासाच्या सुचना दिल्या होत्या. या पथकातील अक्षय जगदाळे यांना टीप मिळाली की, मायणी येथील दोन व्यक्तींनी ही चोरी केली आहे. त्यावर सापळा रचून अजित पाटील आणि अभिषेक कदम यांना पोलीस ठाण्यामध्ये आणून सखोल तपास केला. त्यांनी हा गुन्हा केल्याबाबतची कबुली दिली. त्यांच्याकडून २ लाख रुपये किंमतीची टाटा- २०७ चारचाकी पिकअप गाडी, मोटरसाय कल (एम एच०२- एच ए ०९९२) आणि संबंधित १४ लोखंडी बर्गे जप्त करण्यात आले आहेत.
हेही वाचा