सांगली, सातार्‍यातील पाण्याचे नियोजन एकत्रितपणे केले जाईल; फडणवीस यांची ग्वाही | पुढारी

सांगली, सातार्‍यातील पाण्याचे नियोजन एकत्रितपणे केले जाईल; फडणवीस यांची ग्वाही

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगली आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यांचा एकत्रित विचार करून पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात येतील. दोन्ही जिल्ह्यांचे हित पाहून पाणी नियोजनाचा निर्णय केला जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत दिले.

काँग्रेस सदस्य विश्वजित कदम यांनी माहितीच्या मुद्द्याद्वारे सांगली जिल्ह्यातील पाण्याच्या नियोजनाचा मुद्दा उपस्थित केला. उन्हाच्या झळा सुरू झाल्यासून पुढील तीन महिने कडक उन्हाचे असणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. सांगलीत जूनअखेरपर्यंत पाऊस पडत नाही. गेल्यावर्षी सांगलीत सर्वात कमी पाऊस झाला. त्यामुळे पुढील तीन महिन्यांत कोयनेतून शेती आणि पिण्याच्या पाण्याचा जो विसर्ग होणार आहे त्याचे नियोजन करावे. टाकाडी, टेंभू, म्हैसाळ आणि अरफळ यांच्या आवर्तन आणि पाण्याचे नियोजन करण्याची मागणी कदम यांनी केली.

यावर, दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन सातारा जिल्हा आणि सांगली जिल्ह्यांना एकत्रितपणे बसवून निर्णय घेण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या जातील. गुरुवारी कालवा नियोजन समितीची बैठक आहे. दोन्ही जिल्ह्यांचे हित लक्षात घेऊन यासंदर्भातील निर्णय केले जातील, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.

Back to top button