सांगली : स्मशानातील राख अखेर त्याचा जीव घेऊन गेली | पुढारी

सांगली : स्मशानातील राख अखेर त्याचा जीव घेऊन गेली

भिलवडी; पुढारी वृत्तसेवा : माळवाडी (ता. पलूस) येथील स्मशानभूमीतील राख चाळल्याच्या कारणावरून केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेला प्रवीण संजय घागरे (वय २५, रा. बागडवाडा) याचे मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.

माळवाडी येथे दि. २६ फेब्रुवारीस रात्री आजीच्या रक्षाविसर्जनापूर्वी राख का चाळली, असा जाब विचारत असताना भांडणे सुरू झाली होती. यावेळी भांडणे सोडविण्यासाठी गेलेले शुभम व प्रवीण घागरे यांना सिमेंटच्या ब्लॉकने डोक्यात मारहाण करण्यात आली होती. त्यामध्ये प्रवीण हा गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचार करून नंतर मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. परंतु उपचार सुरू असताना रविवारी पहाटे त्याचे निधन झाले. मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून भिलवडी पोलिस स्टेशनचे साहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

याप्रकरणी भिलवडी पोलिसांनी नीलेश काशिनाथ मोटकट्टे, विक्रम शरद बंडलकर, विनोद सुरेश मोटकटे, अर्जुन लक्ष्मण मोटकट्टे, राहुल बाळू मोटकट्टे, पंडित शशिकांत मोटकट्टे, वैभव दिलीप मोटकट्टे, विरोध राजेंद्र बुधावले, अभिजित राजेंद्र मोटकट्टे (सर्व रा. माळवाडी) यांना अटक केली.

Back to top button