जत, पुढारी वृत्तसेवा : आवढी (ता.जत) येथे विद्युत पंपासाठी अनाधिकृतपणे हुक टाकून थ्री फेज कनेक्शनचा वापर केल्याने सरपंचावर वीज चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. अण्णासाहेब जगन्नाथ कोडग (वय ४२) असे वीज चोरीचा गुन्हा दाखल झालेल्या सरपंचाचे नाव आहे. तसेच वीज वापर केल्याचा ठपका ठेवून ५८ हजार ८४०रुपये इतका दंड ठोठावण्यात आला आहे. ही कारवाई महावितरणने शनिवारी (दि.१५) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास केली आहे. सहाय्यक अभियंता रश्मी आकेन यांनी याबाबत जत पोलिसात फिर्याद दिली आहे .
ही कारवाई जत महावितरण चे उपकार्यकारी अभियंता अरविंद इंगळे, नियंत्रक उमेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. सरपंच कोडग यांच्यावर विद्युत अधिनियम अन्वये यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपकार्यकारी अभियंता इंगळे यांनी केलेल्या कारवाईने वीज चोरीच्या प्रमाणावर आळा बसणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आवढी येथे अण्णासाहेब जगन्नाथ कोडग यांनी शेतीपंपासाठी महावितरणाची कोणतेही परवानगी न घेता अनाधिकृतपणे हुक टाकून वीज वापर केला आहे. त्यानंतर सहाय्यक अभियंता रश्मी आकेन व मुख्य तंत्रज्ञ विलास तायप्पा दोरकर यांनी कोडग यांच्या शेतात ८ ऑक्टोबर रोजी विद्युत चोरीच्या ठिकाणी भेट देऊन स्थळ पाहणी केली होती. यानुसार वीज चोरी केलेल्या ५८ हजार ८४० रुपये इतका दंड प्रस्तावित केला होता. सरपंच कोडग यांना सदरचा दंड ठोठाण्यात यावा, अशी सूचना करण्यात आली होती. परंतु त्यांनी दंड न भरल्याने त्यांच्यावर विद्युत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .या घटनेचा तपास जत पोलीस करीत आहेत.