Student End Life in Delhi
विजय लाळे
विटा : "माझा मुलगा प्रचंड संवेदनशील. शाळेच्या अभ्यासातही बरा. त्याला एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीज (शालाबाह्य उपक्रम) मध्ये म्हणजे डान्स, मिमिक्री आणि इतर ऍक्टिव्हिटीज मध्ये विशेष रस होता. पण हाच गुण त्याच्या मुळावर आला. शाळेतील चार - चार शिक्षिकांनी केवळ शाळेत मिमिक्री करतो म्हणून त्याला वारंवार टॉर्चर (छळ) केले. याबद्दल तो घरात आमच्याशी बोलायचा, पण आम्ही चार- आठ दिवस कळ काढ, असे त्याला बजावलं होते.
पण आता तो तर परत येणार नाही, त्या शिक्षकांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दलचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे', अशी मागणी मृत शौर्य पाटीलचे वडील प्रदीप पाटील यांनी अत्यंत कातर आवाजात घडलेली घटना सांगताना केली.
सांगली जिल्ह्यातील ढवळेश्वर (ता. खानापूर) येथी मूळचे प्रदीप पाटील यांचे कुटुंब दिल्लीत राजीवनगर भागात सोने- चांदीचा गलाईचा व्यवसाय करतात. त्यांचा मुलगा तिथे सेंट कोलंबस शाळेत सीबीएसई अभ्याक्रमाच्या दहावी इयत्तेत शिकत होता. तेथील शिक्षिकांच्या जाचाला कंटाळून शौर्यने मंगळवारी (दि. १८) राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅट फॉर्म क्रमांक २ वरून खाली उडी मारून आत्महत्या केली. विशेष म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुईसाईट नोट लिहिली असून शाळेतील शिक्षिकांनी मानसिक छळ केल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे, असे शौर्यने दीड पानाच्या सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे.
याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. जखमी अवस्थेतील शौर्य यास पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शौर्यचे वडील प्रदीप हे आई आजारी आहे, म्हणून गावी ढवळेश्वरला आले होते. या घटनेची माहिती त्यांना मिळाल्यानंतर ते तातडीने दिल्लीला गेले. त्यानंतर आज गुरुवारी एअर अॅम्ब्युलन्सने शौर्यचे पार्थिव ढवळेश्वरला आणण्यात आले.
सकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी दिल्ली च्या राजा गार्डन मेट्रो पोलिसांनी संबंधित शाळेच्या प्राचार्या अपराजिता पाल आणि मनू कालरा, युक्ती महाजन आणि ज्युली व्हर्गिस या शिक्षिकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणी खासदार निलेश लंके यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहून दिल्लीतील संबंधित शाळेवर आणि शिक्षकांवर त्वरित कारवाई करा, अशी मागणी केली आहे.
मात्र, अद्यापही या आत्महत्येप्रकरणी शाळेतील शिक्षकांवर कारवाई झालेली नाही. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यां चे स्वतंत्र जबाब घेतले जावेत आणि संबंधित चार शिक्षकांवर आपल्या मुलाला आत्महत्या प्रवृत्त केले असा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वडील प्रदीप पाटील यांनी केली आहे.
ते म्हणाले की, आत्महत्या करण्यापूर्वी शौर्याने वारंवार आपण शिक्षिकांच्या मानसिक छळाने प्रचंड अस्वस्थ आहोत, मला त्या शाळेत ठेऊ नका, अशी विनंती केली होती. त्याला मी चार आठ दिवस थांब, आपण निर्णय घेऊ या, असे सांगितले होते. अगदी सोमवारी रात्री साडे अकरा बारा वाजेपर्यंत मी आणि माझा मोठा मुलगा हसत खेळत त्याच्याशी बोलत होतो. त्यानंतर मंगळवारी पहाटे मी दिल्लीहून इकडे ढवळेश्वरला आलो. दुपारी येऊन इथे पोहोचतो न पोहोचतो तोच मला आमच्या गाडी चालकाचा फोन आला. शौर्य रस्त्यावर पडला आहे, गंभीर जखमी आहे. मी तातडीने माझ्या लोकांना तिथे पाठवले. शाळेचा गणवेश, गळ्यात आय कार्ड, स्कूल बॅग तशीच होती.
या स्कूल बॅगमध्ये सुसाईड नोट होती. दिल्ली पोलिसांना ती सापडली. त्यात 'मेरा नाम शौर्य पाटील हैं... इस मोबाइल... नंबर पर कॉल कर देना प्लीज... आय अॅम व्हेरी सॉरी... आय डीड धीस... पर स्कूलवालोंने इतना बोला की, मुझे यह करना पड़ा. यदी किसी को जरूरत हो तो मेरे अंग दान कर देना. मेरे पॅरेंटसने बहुत कुछ किया, आय अॅम सॉरी, मैं उनको कुछ नहीं दे पाया... सॉरी भैय्या... सॉरी मम्मी, आपका आखरी बार दिल तोड रहा हूं... स्कूल की टीचर है ही ऐसी क्या बोलू... वगैरे असा मजकूर होता.
दरम्यान, याबाबत आमदार सुहास बाबर यांनी आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून प्रदीप पाटील कुटुंबाला न्याय देण्याचा प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया दिली आहे.