सांगली ः न्यायालयाच्या निर्णयानंतर शिक्षण विभागाने शिक्षक समायोजन प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात सुमारे 150 हून अधिक शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. या शिक्षकांचे इतर शाळेत समायोजन करण्यात येणार आहे. समायोजनाच्या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या व समायोजनाच्या आदेशाला संघटनांनी न्यायालयात आव्हान दिले होते. पण न्यायालयाने याचिका फेटाळून लावली. शासनाचा निर्णय कायम ठेवला. त्यानंतर शालेय शिक्षण विभागाने लगेच समायोजनाची कार्यवाही सुरू केली आहे. दि. 5 डिसेंबरपर्यंत समायोजन पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे अनेक शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. दरम्यान, अतिरिक्त शिक्षकांची अचूक संख्या निश्चित न झाल्याने निर्णयाची अंमलबजावणी करू नये अशी शिक्षक संघटनांची भूमिका आहे. शिक्षण विभागाने दि. 15 मार्च 2024 च्या परिपत्रकाच्या आधारे व 2024-25 या शैक्षणिक वर्षातील पटसंख्येनुसार समायोजन सुरू केले आहे. अतिरिक्त झालेल्या शिक्षकांना सध्याची शाळा व गाव सोडून अन्यत्र जावे लागणार आहे.प्राथमिक, माध्यमिकमधील सध्या 150 अतिरिक्त ठरणार असल्याचा अंदाज आहे. ही आकडेवाडी वाढू शकते. पुढील दोन दिवसांत आकडेवारी समोर येईल.
या निर्णयामुळे कमी पटसंख्येच्या शाळा बंद झाल्यास तेथील विद्यार्थ्यांना दूर अंतरावरील शाळा शोधावी लागणार आहे. याचा परिणाम म्हणजे विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होण्याचा धोका आहे. तसेच अतिरिक्त झालेल्या शिक्षकांना रिक्त जागांवर नियुक्त केले जाईल. त्यामुळे नव्याने शिक्षक भरती देखील लांबणार आहे.