

सांगली : महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी दि. 27 नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. दरम्यान, प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत प्रभाग क्रमांक 15 मधील पंधराशेहून अधिक मतदार प्रभाग क्रमांक 16 व 18 मध्ये समाविष्ट झाले आहेत, तर अन्य काही भागातील मतदारांची नावे प्रभाग क्रमांक 15 च्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट असल्याचे आढळून येत आहे. त्याबाबत हरकत घेतली जाणार आहे, अशी माहिती माजी नगरसेवक फिरोज पठाण, रवींद्र वळवडे यांनी दिली.
प्रभाग क्रमांक पंधरामधील रमामाता नगर, काळे प्लॉट, भोसले प्लॉट, पाकीजा मस्जिदच्या पाठीमागे गजानन कॉलनी, महावितरण उपकेंद्र या भागातील सुमारे बाराशे मतदारांची नावे प्रभाग क्रमांक 18 च्या प्रारूप यादीत समाविष्ट झाली आहेत. फौजदार गल्लीतील बागडी गल्ली, तसेच फौजदार गल्लीतील काही भाग हा प्रभाग क्रमांक 15 मध्ये समाविष्ट आहे. मात्र प्रारूप मतदार यादीत या भागातील सुमारे अडीचशे मतदार हे प्रभाग क्रमांक 16 च्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट केले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यासमोरील मद्रासी कॉलनीतील काही भाग हा प्रभाग क्रमांक 15 मध्ये असतानाही यातील सुमारे 50 मतदारांची नावे प्रारूप यादीत प्रभाग क्रमांक 16 मध्ये दिसत आहेत. अशाप्रकारे प्राथमिक माहितीनुसार प्रभाग क्रमांक पंधरामधील पंधराशे मतदार हे प्रभाग क्रमांक 18 व प्रभाग क्रमांक 16 च्या प्रारूप यादीत समाविष्ट झाले आहेत. ही चूक दुरुस्त करून प्रभाग क्रमांक 15 चे मतदार हे पुन्हा प्रभाग क्रमांक 15 मध्ये समाविष्ट करणे गरजेचे आहे, अशी मागणी माजी नगरसेवक फिरोज पठाण, रवींद्र वळवडे यांनी केली आहे.
जामवाडी, गवळी गल्ली, बुरुड गल्ली, जेठाभाई वाडी हा भाग प्रभाग क्रमांक 15 मध्ये समाविष्ट नाही. मात्र या भागातील सुमारे 700 ते 800 मतदार हे प्रभाग क्रमांक 15 च्या प्रारूप मतदार यादीत मध्ये समाविष्ट झालेले आहेत. प्रभाग क्रमांक 15 मधील काही मतदार हे अन्य प्रभागातील प्रारूप यादीत समाविष्ट आहेत तर अन्य काही प्रभागातील काही मतदार प्रभाग क्रमांक 15 च्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट आहेत. महापालिका प्रशासनाने ही चूक दुरुस्त करावी व मतदार यादी बिनचूक करावी, यासाठी हरकत दाखल करणार आहे, अशी माहिती माजी नगरसेवक फिरोज पठाण यांनी दिली.