Cyber Crime  ( File Photo)
सांगली

Sangli Cyber Crime | ऑनलाइन स्टोअरच्या आमिषाने १.४० कोटींची फसवणूक; विट्यात १४ जणांविरुद्ध गुन्हा

मोठा आर्थिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवत ५० वर्षीय व्यक्तीची तब्बल १ कोटी ४० लाख २६ हजार ८३८ रुपयांची फसवणूक

पुढारी वृत्तसेवा

Vita Online Store Fraud

विटा : ऑनलाइन स्टोअर सुरू करून मोठा आर्थिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवत ५० वर्षीय व्यक्तीची तब्बल १ कोटी ४० लाख २६ हजार ८३८ रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार विट्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर विटा पोलीस ठाण्यात १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजीनगर (विटा) येथे वास्तव्यास असलेले मूळचे चिखली (जि. बुलढाणा) येथील निरंजन शिशिर महाजन (वय ५०) यांना Store-NVIY या वेबसाइटच्या माध्यमातून ऑनलाइन स्टोअर सुरू करण्याचे आमिष दाखवण्यात आले. त्यानुसार २६ सप्टेंबर २०२५ ते ४ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत संशयितांनी यूपीआय, आरटीजीएस आणि आयएमपीएसद्वारे टप्प्याटप्प्याने एकूण १ कोटी ४० लाख २६ हजार ८३८ रुपये जमा करण्यास भाग पाडले.

मात्र, पैसे भरूनही ऑनलाइन स्टोअर सुरू करण्यात आले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर निरंजन महाजन यांनी विटा येथील न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १७५(३) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिल्यानंतर विटा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

या प्रकरणी Store-NVIY (कॅलिफोर्निया, अमेरिका) तसेच कार्तिक राज गौतम, सिद्धार्थ पढीयार, यश स्टुडिओ, वसीम अहमद, अमनप्रीत सिंग, बलजिंदर सिंग, हिमांशु, रजनी, कृष्णा एक्सपर्ट्स, विश्वजीत सिंग, व्ही. ए. ट्रेडर्स, निखिल राणा, कश्मीर सिंग आणि साहिलप्रीत सिंग यांच्यासह एकूण १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे करत असून, एवढ्या मोठ्या ऑनलाइन आर्थिक फसवणुकीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT