Sangli News : विटा-कराड मार्गावर सुविधा कधी?

साईड पट्ट्या झाडाझुडपांनी झाकाेळल्या : वाहनधारकांच्या जीवाशी खेळ
Vita-Karad Road
नेवरी : विटा- कराड मार्गावरील नांदणी नदी ते कडेगाव मार्गावर झाडाझुडपांनी झाकाळलेल्या धोकादायक साईड पट्ट्या. (छाया : अरुण साळुंखे, नेवरी)
Published on
Updated on

नेवरी : विजापूर - गुहागर राष्ट्रीय महामार्गावरील विटा कराड रस्त्यावरील साईड पट्ट्या झाडाझुडपाने झाकल्यामुळे अनेक अपघात घडत आहेत. याबाबत ठेकेदार व प्रशासन डोळेझाक करीत असल्यामुळे अनेक वाहनधारकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. टोलवसुली सुरू असूनदेखील सुविधा नसल्यामुळे वाहनधारकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

परिसरामध्ये सध्या पावसाने सुरुवात केली आहे. नांदणी नदीपासून पुढे कडेगावपर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या साईडपट्ट्या अनेक ठिकाणी बाभळ व इतर काटेरी झाडांझुडपांनी झाकाेळल्या आहेत. रात्रीच्या वेळी या मार्गावरून वाहनधारकांना वाहन चालवताना सर्कस करावी लागत आहे. पावसामुळे या ठिकाणी जास्त धोका निर्माण होत आहे. साईड पट्ट्यावरून जाणाऱ्या वाहनांचा अनेक वेळा या झाडाझुडपामूळे गंभीर अपघात घडत आहे. या मार्गावर असणाऱ्या येवलेवाडी ता. कडेगाव येथील टोलनाका सुरू झाला. परंतु या मार्गावर वाहनधारकांच्या सुविधांना मात्र हारताळ फासला आहे. यामुळे वाहनधारकांना टोल भरून दोन्ही बाजूने भुर्दंड सहन करावा लागत आहे.

हा महामार्ग कराड व नागज या ठिकाणच्या महामार्गाला जोडला जात आहे. परंतु कराड ते नागज दरम्यानचे घाटरस्ते व अनेक ठिकाणी महामार्गाचे काम अद्याप अपूर्ण आहे. महामार्गावरील हे अडथळे वाहनधारकांच्या जीवाला धोका ठरत आहेत. टोल वसुलीचा निर्णय व रस्ता बांधणी बाबतचा विषय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा असल्याचे टोल व्यवस्थापन सांगते. वाहनधारकांच्या घडलेल्या अपघाताची जबाबदारी कोणाची? टोल घेताय पण सुविधांचं काय, असा सवाल वाहनधारक करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news