सांगली

इस्लामपूर : पैशांच्या वादातून डोक्यात दगड घालून मित्राचा खून

अविनाश सुतार

इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा : बहे (ता. वाळवा) येथील खुनी हल्ल्यातील जखमी सचिन तानाजी पाटील (वय ३४, रा. बहे) याचा उपचारादरम्यान आज (मंगळवार) मृत्यू झाला. जखमी सचिनवर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. सोमवारी दुपारी पैशाच्या देवघेवीच्या वादातून सचिनच्या मित्राने त्याच्या डोक्यात दगड घातला होता. याप्रकरणी सुनील अनुसे (रा. हुबालवाडी) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या प्रकरणी संशयित लाला उर्फ विशाल विजय भोसले (वय ३२, रा. बहे) याच्यावर इस्लामपूर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, सोमवारी दुपारी १२.३० च्या सुमारास सुनील अनुसे, महेश घबक, सचिन पाटील, विशाल भोसले हे बहे येथील शाळेच्या परिसरात गप्पा मारत बसले होते. त्यावेळी विशाल हा सचिन याला म्हणाला, ' माझा पैशाचा व्यवहार गोडीत मिटव, नाहीतर मी तुला एके दिवशी बघून घेईन.' 'मी तुला एकदा सांगितले ना, व्यवहाराप्रमाणे तुला पैसे देतो, जास्त मागशील तर देणार नाही' असे म्हणत सचिन याने विशाल याच्याशी वाद घातला.

तेथे असणाऱ्या मित्रांनी दोघांचा वाद मिटविला. त्यानंतर विशाल भोसले हा मोटारसायकलवरून निघून गेला. सुनील, महेश, सचिन हे शाळेच्या व्हऱ्यांड्यामध्ये झोपले होते. सुनील याला फरशीवर जोरात काहीतरी आदळल्याचा आवाज ऐकू आला. विशाल याने मोठा दगड उचलून सचिन पाटील याच्या डोक्यात मारला होता. सचिन रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे सुनील याला दिसले. त्यांनी धाव घेत महेश, सुनील यांनी विशाल याला जोरात ढकलून दिले. त्याच्या हातातील दगड बाजूला पडला. जखमी सचिन याला कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT