जालिंदर हुलवान
मिरज : सांगली, मिरज, कुपवाड महापालिका निवडणुकीमध्ये (2026) मिरजेतील जनतेने पुन्हा एकदा प्रस्थापितांना स्वीकारल्याचे स्पष्ट झाले. तसेच 14 नवख्यांचाही नगरसेवक म्हणून महापालिकेत प्रवेश झाला आहे. 23 पैकी 12 महिला नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत.
महापालिकेच्या एकूण 78 जागांपैकी मिरजेत 23 जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये सुमारे 128 उमेदवारांनी नशीब अजमावले. काही माजी नगरसेवकांनीही पुन्हा महापालिकेत जाण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्यासह सहा विद्यमान नगरसेवक आणि अनेक नव्या चेहऱ्यांना देखील जनतेने नाकारले. अनेकवेळा निवडणूक लढविणाऱ्या अनेकांना पराभव स्वीकारावा लागला आहे. अशा काही उमेदवारांचे तर डिपॉझीटही जप्त झाले आहे.
काँग्रेसचे नेते देवाप्पा आवटी यांच्यापासून आवटी घराण्याची राजकारणात सुरुवात झाली. माजी नगरसेवक सुरेश आवटी हे अनेकवेळा तत्कालीन नगरपालिकेत व महापालिकेत निवडून आले होते. ते मिरजेचे नगराध्यक्ष देखील होते. त्यांची परंपरा त्यांच्या दोघा पुत्रांनी पुढे सुरू ठेवली. 2018 च्या निवडणुकीमध्ये भाजपच्या तिकिटावर नगरसेवक झालेले निरंजन आवटी व संदीप आवटी हे दोघेजण पुन्हा भाजपच्याच तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. माजी खासदार संजय पाटील यांच्यासह अनेकांनी आवटी बंधूंना पराभूत करण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र त्यांचे मनसुबे धुळीस मिळाले. अखेर निरंजन व संंदीप हे दोघेजण विजयी झाले.
जामदार घराणे हे मिरजेच्या राजकारणात प्रसिद्ध आहे. रामचंद्र जामदार हे 1947 मध्ये मिरजेचे नगराध्यक्ष होते. ते दोनवेळा नगराध्यक्ष होते. बापूसाहेब जामदार हे दोनवेळा नगराध्यक्ष होते. सध्याचे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी महापौर किशोर जामदार हे दोनवेळा मिरजेचे नगराध्यक्ष होते. किशोर जामदार यांच्या पत्नी उत्कर्षा जामदार या नगरसेविका होत्या. त्यांचे पुत्र करण जामदार हे 2018 मध्ये निवडून आले होते. या निवडणुकीतही करण जामदार यांना दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून जनतेने संधी दिली आहे.
मिरजेच्या राजकारणात बागवान यांचाही दबदबा कायम राहिलेला दिसला. माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांनी सलग सहावेळा नगरसेवक म्हणून निवडून जाण्याचा मिरजेत विक्रम केला आहे. 1998 पासून महापालिकेच्या स्थापनेपासून ते महापालिकेत नगरसेवक आहेत. यंदाच्या निवडणुकीत त्यांनी माजी मंत्री जयंत पाटील यांची साथ सोडली. त्यामुळे जयंत पाटील यांचा एकही नगरसेवक मिरजेत निवडून आला नाही. बागवान यांना तर या निवडणुकीत सर्वाधिक म्हणजे 5 हजार 913 इतके मताधिक्य मिळाले आहे. इतके मताधिक्य मिरजेतील कोणत्याच नगरसेवकाला मिळाले नाही.
मिरजेच्या राजकीय पटलावर चौधरी घराण्याचाही वरचष्मा दिसला आहे. माजी सभापती व नेते इब्राहीम चौधरी यांच्या पत्नी यास्मिन, पुत्र आरिफ व दुसरे पुत्र जुबेर हे देखील नगरसेवक होते. आता प्रभाग 3 मधून माजी नगरसेवक जुबेर चौधरी यांच्या पत्नी रेश्मा चौधरी या राष्ट्रवादीतून निवडून आल्या आहेत. गेल्या 15 वर्षांपासून वनखंडे या आडनावाचा मिरजेच्या राजकारणात बोलबाला आहे. मोहन वनखंडे हे माजी मंत्री आमदार सुरेश खाडे यांचे अत्यंत जवळचे होते. ते खाडे यांच्यासोबत असताना अनिता वनखंडे या भाजपच्या तिकिटावर नगरसेविका बनल्या होत्या. ते आता खाडेंसोबत नाहीत. मात्र मोहन वनखंडे यांचे पुत्र सागर वनखंडे हे प्रभाग क्रमांक 3 मध्ये एकनाथ शिंदे शिवसेना या पक्षातून निवडून आले आहेत.
माजी नगरसेवक शिवाजी दुर्वे हे 1996 पासून विजयी होत आहेत. ते तत्कालीन नगरपालिकेपासून नगरसेवक आहेत. ते 2018 मध्ये भाजपकडून निवडून आले होते. यंदा त्यांच्या पत्नी शैला दुर्वे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती. त्यांनाही जनतेने नगरसेविका म्हणून संधी दिली आहे. मिरजेच्या राजकारणात संजय मेंढे यांचाही दबदबा आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून म्हणजे 1998 पासून मेंढे हे नगरसेवक आहेत. संजय मेंढे यांच्या पत्नी बबिता मेंढे या पहिल्यांदा 1998 मध्ये निवडून आल्या. त्यानंतर संजय मेंढे नगरसेवक झाले. 2013 पासून संजय मेंढे व बबिता मेंढे हे दाम्पत्य महापालिकेत नगरसेवक आहे. या दोघांना यंदाही जनतेने संधी देऊन या दाम्पत्याची विजयाची हॅट्ट्रिक घडवली आहे.
मिरजेच्या राजकारणामध्ये काझी घराण्याचीही चर्चा सतत असते. महंमद काझी हे अनेकवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. महंमद काझी यांचे चुलत बंधू अल्लाउद्दीन काझी यांचा तर तुरुंगात असतानाही निवडून येण्याचा विक्रम आहे. महंमद काझी यांच्या पत्नी रजीया काझी या 2018 च्या महापालिका निवडणुकीत निवडून आल्या होत्या. त्यांना सर्व 78 नगरसेवकांपैकी सर्वात जास्त मते मिळाल्याने त्या निवडणुकीत त्यांचा विक्रम झाला होता. रजिया काझी यांचे पुत्र आजम काझी हे या निवडणुकीत राष्ट्रवादीतून विजयी झाले आहेत.
राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवडी यांचे पुत्र अतहर नायकवडी हे दुसऱ्यांदा नगरसेवक झाले आहेत. इद्रिस नायकवडी हे नगराध्यक्ष व महापौर देखील होते. गणेश माळी यांना देखील जनतेने दुसऱ्यांदा नगरसेवक बनविले आहे. माळी हे भारतीय जनता पार्टीकडून सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. रिपब्लिकन पार्टीचे नेते माजी महापौर विवेक कांबळे यांच्या पत्नी रेखा कांबळे यांनाही जनतेने निवडून दिले आहे.