सांगली : महापालिका निवडणुकीचे वातावरण तापले आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतरच्या पहिल्याच रविवारी बैठका, गाठीभेटी, प्रचार फेऱ्या, पदयात्रांचा धुरळा उडाला. जवळपास सर्वच प्रभागांमध्ये विविध पक्ष, अपक्षांच्या निवडणूक कार्यालयांचे मोठ्या धडाक्यात उद्घाटन झाले. यानिमित्ताने प्रभागांमध्ये पक्ष आणि उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
भाजपचा प्रचार प्रारंभ शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झाला. यानंतर रविवारी गणपती मंदिर येथे शिवसेनेचा प्रचार प्रारंभ झाला. विश्रामबाग येथे प्रचार सभा झाली. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रवादी, शिवसेना उबाठा या पक्षांच्या उमेदवारांनीही ज्या-त्या प्रभागात प्रचार कार्यालयांचे उद्घाटन करून प्रचार सुरू केला. उमेदवारी अर्ज माघारीनंतरचा पहिलाच रविवार असल्याने महापालिका क्षेत्रात दिवसभर प्रचाराचा धुरळा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. सर्व राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही प्रचारात आघाडी घेत मतदारांच्या गाठीभेटी, प्रचार फेऱ्या आणि बैठका घेतल्या.
शहरातील अनेक प्रभागांमध्ये रविवारी निवडणूक प्रचार कार्यालयांचे उद्घाटन झाले. या उद्घाटनाच्या निमित्ताने संबंधित उमेदवारांनी नेते, कार्यकर्त्यांसह शक्तिप्रदर्शन करत आपली ताकद दाखवली. पदयात्रांमुळे अनेक प्रभागांमध्ये उत्साही वातावरण होते. काही ठिकाणी बैठका घेऊन विकासकामांचे मुद्दे, स्थानिक समस्या आणि पुढील पाच वर्षांचा आराखडा मतदारांसमोर मांडण्यात आला.
मतदान दि. 15 जानेवारीरोजी होणार असून प्रचारासाठी आता अवघे नऊ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे प्रत्येक उमेदवार आपली बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी कसून प्रयत्न करताना दिसत आहेत. शेवटच्या टप्प्यातील प्रचारात वैयक्तिक संपर्क, प्रभागनिहाय बैठका आणि पक्ष, संघटनांच्या ताकदीची खरी कसोटी लागणार आहे. या निवडणुकीचा निकाल दि. 16 जानेवारीरोजी मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.