

सांगली : महापालिका निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांना शनिवारी चिन्ह वाटप करण्यात आले. यावेळी अनेक अपक्षांकडून लिफाफा, गॅस सिलिंडर, नारळ, कपबशी या चिन्हांना मागणी मोठी होती, तर पुस्तक, पेनाची नीब ही चिन्हे मात्र उपेक्षित राहिली. अगदीच मोजक्या अपक्ष उमेदवारांनी हे चिन्ह निवडणुकीसाठी घेतले. उमेदवारी अर्जात प्राधान्यक्रमाने मागणी केल्यानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चिन्हांचे वाटप केले.
महापालिका निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. शुक्रवारी उमेदवारी अर्जांची छाननी झाली. वीस प्रभागांतील 78 जागांसाठी 381 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. शनिवार, दि. 3 जानेवारी रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. अपक्ष उमेदवारांमध्ये लिफाफा, गॅस सिलिंडर, नारळ, कप-बशी या चिन्हांसाठी मोठी मागणी होती. अर्ज भरताना दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार सदरचे चिन्हा वाटप करण्यात आले. लिफाफा, नारळ, कप-बशी यासह हिरा, बॅट, नगारा, ऑटोरिक्षा, टेबल, मेणबत्ती, छताचा पंखा, नारळाची बाग, कपाट, एअरकंडिशनर, सफरचंद, पुस्तक, पेनाची नीब, फुटबॉल, इंजेक्शन, चावी, विटा आदी चिन्हांचे वाटप अपक्ष उमेदवारांना करण्यात आले.
महापालिका निवडणुकीसाठी दि. 15 रोजी मतदान, तर दि. 16 रोजी मतमोजणी होणार आहे. आजपासून प्रचारासाठी नऊ दिवसांचा कालावधी उमेदवारांना मिळणार आहे. गेले आठ दिवस उमेदवार निश्चित करणे, उमेदवारी अर्ज भरणे, छाननी व अर्ज मागे घेणे यामध्ये गेले. माघारीसाठीचे दोन दिवस राजकीय पक्षांसाठी महत्त्वाचे ठरले. यात अनेक बंडखोर अपक्ष उमेदवारांना माघार घेण्यासाठी नेत्यांनी मिनतवाऱ्या केल्या. त्यात नेत्यांना बऱ्यापैकी यश आले. सुमारे 301 अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. सर्वच प्रभागात बहुरंगी लढती होत असल्याने निवडणुकीचे वातावरण आता तापू लागले आहे. मतदानापूर्वी प्रचाराचा पहिला सुपर संडे आज, दि. 4 रोजी, तर दुसरा सुपर संडे दि. 11 रोजी आहे. त्यामुळे उमेदवारांना निवडणूक प्रचारासाठी जोरदार यंत्रणा राबवावी लागणार आहे.
मैदान तापले...
अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. निवडणूक रिंगणातील उमेदवार निश्चित झाले आहेत. प्रत्येक उमेदवाराकडे आता आपले निवडणूक चिन्ह आले आहे. त्यामुळे आता राजकीय मैदान खऱ्याअर्थाने तापू लागले आहे. प्रचाराच्या घोषणांनी, बॅनर-फलकांनी आणि कार्यकर्त्यांच्या हालचालींनी आता परिसर गजबजून जाणार आहे. निवडणूक प्रचाराचा पहिला सुपर संडे दि. 4 जानेवारी रोजी आहे. या दिवशी उमेदवारांची ताकद, संघटनशक्ती आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याची क्षमता प्रत्यक्ष निवडणूक मैदानात दिसून येईल. निवडणूक लढतीला निर्णायक वेग येईल.