

कुपवाड : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी एक, दोन आणि आठ या तीन प्रभागात एकूण 52 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. तीन प्रभागातील 12 जागांसाठी 64 उमदेवार रिंगणात आहेत. प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अर्ज माघार घेतल्याने वरिष्ठांची मनधरणी यशस्वी झाल्याचे चित्र दिसून आले.
कुपवाड शहर प्रभाग एक अनुसूचित जाती गटात महाविकास आघाडीकडून माजी नगरसेवक शेडजी मोहिते, भाजपचे रवींद्र सदामते, शिंदे शिवसेनेचे अनिल मोहिते, बहुजन समाज पार्टीचे क्रांतिकुमार कांबळे, तर वंचित बहुजन आघाडीकडून शिवाजी वाघमारे व अपक्ष निखिलेश पाटोळे व प्रतीक फाळके यांच्यात लढत होणार आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटात महाविकास आघाडीच्या रईसा रंगरेज, एकनाथ शिंदे शिवसेनेच्या पायल गोसावी, भाजपच्या माया गडदे, तर अपक्ष विद्या खिलारे यांच्यात चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
सर्वसाधारण महिला गटात महाविकास आघाडीच्या अभियंता सूर्यवंशी, भाजपाच्या माजी नगरसेविका पद्मश्री पाटील, शिंदे शिवसेनेच्या रेश्मा तुपे, वंचित बहुजन आघाडीच्या निशा बुचटे, तर अपक्ष विद्या जाधव, सुप्रिया देशमुख यांच्यात लढत होणार आहे. सर्वसाधारण गटात महाविकास आघाडीचे माजी उपमहापौर विजय घाडगे, भाजपचे चेतन सूर्यवंशी, शिंदे शिवसेनेचे संदीप तुपे, जयहिंद सेनेचे रणजित पवार यांच्यात लढत होणार आहे.
प्रभाग दोनमध्ये अनुसूचित जाती महिला गटात महाविकास आघाडीच्या माजी नगरसेविका सविता मोहिते, शिंदे शिवसेनेच्या माजी नगरसेविका अनिता वनखंडे, तर भाजपच्या प्राजक्ता सनी धोतरे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग गटातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी नगरसेवक गजानन मगदूम, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक प्रकाश ढंग, महाविकास आघाडीचे अय्याज नायकवडी, शिंदे शिवसेनेचे सिद्राम दलवाई, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कासम मुल्ला अशी पंचरंगी लढत होणार आहे. सर्वसाधारण महिला गटात भाजपच्या मालुश्री खोत, महाविकास आघाडीच्या प्रेरणा कोळी, तर शिंदे शिवसेनेच्या शमाबी मुजावर, वंचित बहुजन आघाडीच्या मेहराजबी मकानदार यांच्यात लढत होणार आहे. सर्वसाधारण गटात भाजपचे प्रकाश पाटील, महाविकास आघाडीचे समीर मालगावे, शिंदे शिवसेना विनायक यादव, वंचित आघाडीचे मोहन साबळे यांच्यात लढत होणार आहे.
प्रभाग आठमध्ये अनुसूचित जाती गटात अजित पवार राष्ट्रवादीचे संजय कोलप, भाजपतर्फे दीपक वायदंडे, शिंदे शिवसेनेचे महेश सागरे, विनोद सौदी, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अभिजित कनिरे, समाजवादी पार्टीचे राजन बालगावकर, वंचित बहुजन आघाडीचे सतीश सरवदे, तर अपक्ष म्हणून संदीप कांबळे, मच्छिंद्रनाथ हेगडे यांच्यात लढत होणार आहे.
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गट अजित पवार राष्ट्रवादीच्या प्रियंका देशमुख, भाजपच्या योगिता राठोड, शिंदे शिवसेनेच्या जिजा लेंगरे तर अपक्ष कल्पना कोळेकर, उज्ज्वला सुतार यांच्यात लढत होणार आहे. सर्वसाधारण महिला गटात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या पूनम मोकाशी, भाजपाच्या मीनाक्षी पाटील, शिंदे शिवसेनेच्या नीता शिंदे, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या सेफ्टी कनिरे, वंचित बहुजनआघाडीच्या भारती भगत, तर अपक्ष सपना गायकवाड यांच्यात लढत होणार आहे.
सर्वसाधारण गटात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक विष्णू माने, भाजपचे संजय पाटील, शिंदे शिवसेनेतर्फे स्वप्निल औंधकर, समाजवादी पार्टीतर्फे नितीन मिरजकर, शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे अनिल माने, तर अपक्ष सिद्धराम शिंखुनाळे यांच्यामध्ये लढत होणार, हे स्पष्ट झाले आहे.