जत(सांगली); पुढारी वृत्तसेवा : भिवर्गी (ता.जत) येथील दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या मुलीचा मृतदेह अखेर एका विहिरीत आढळून आला. विहिरीत बुडून मृत्यू झालेल्या मुलीचे नाव कल्पना मल्लू तांबे (वय १५) असे आहे. शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता मुलीचे अपहरण झाल्याची नोंद पोलिसात झाली होती. परंतु, रविवारी सकाळी ८ वाजता एका विहिरीत पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. याबाबतची माहिती पोलीस पाटील श्रीशैल चौगुले यांनी उमदी पोलिसात दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवर्गी येथील कल्पना तांबे ही मुलगी दहावी शिकत होती. शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान घरातून जनावरासाठी वैरण आणते म्हणून गेली होती. परंतु ती घराकडे परतलीच नाही. तांबे कुटुंबियांनी रात्रभर शोधाशोध केली. अखेर ती मिळून आली नाही. शनिवारी उमदी पोलिसात कल्पनाच्या अपहरणाबाबत तक्रार तिचे भाऊ मायाप्पा मल्लू तांबे यांनी दिली.
रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शेता शेजारी असणाऱ्या बाळू म्हातारबा करे यांच्या विहिरीत कल्पनाचा मृत्यू देह दिसून आला. ही माहिती संबंधित शेतकऱ्यांने कल्पनाचे भाऊ मायाप्पा तांबे यास दिली. संशयास्पद मृत्यू असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू आहे. याबाबत माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा