प्रवीण जगताप
लिंगनूर : बाजारपेठेत बेदाण्याच्या दरात हळूहळू का होईना, पण उच्चांकी वाढ होत आहे. त्यामुळे द्राक्ष पिकास येणाऱ्या काळात पुन्हा सोन्याचे दिवस येऊ शकतात, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.
जिल्ह्यातील दहा तालुक्यांतील हजारो एकर क्षेत्र द्राक्ष शेतीसाठी नोंदलेले आहे. गेल्या चार वर्षांत मार्केटिंगच्या द्राक्षांना सरासरी चांगले दर मिळाले नाहीत. अवकाळी पाऊस, लहरी वातावरण व बदलते हवामान यामुळे चार वर्षांत अनेक बागांचे नुकसान झाले. एका बाजूला मालाची आवक कमी असूनही गेल्या दोन वर्षांत द्राक्षाचे दर वाढायला हवे होते, मात्र दरात वाढ झाली नाही. हंगामाच्या सुरुवातीला परराज्यात निर्यात होणाऱ्या काही द्राक्षांना चांगला दर मिळतो, असा अनुभव आहे. पण यावर्षी द्राक्षांना 600 ते 700 रुपये प्रति चार किलो असा उच्चांकी दर कोंगनोळी (ता. कवठेमहांकाळ) येथे मिळाला होता. सध्याही 400 ते 600 रुपये क्वचित काढणीला आलेल्या बागांना दर मिळत आहेत. मात्र यावर्षी ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर फळ छाटणी झाली आहे. त्यामुळे मार्च महिन्यात द्राक्षांचा खरा हंगाम सुरू होणार आहे. त्यावेळी काय दर मिळतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
गतवर्षी ज्यांनी बेदाणे तयार केले व चांगल्या दराच्या अपेक्षेने कोल्ड स्टोअरेजला ठेवले, त्या बेदाण्यास दिवाळीपासून चांगला दर मिळतो आहे. नोव्हेंबर महिन्यात हिरव्या बेदाण्यास 440 रुपयांचा उच्चांकी दर, तर पिवळ्या बेदाण्यास 390 पर्यंत चांगला दर मिळाला आहे.
सांगली मार्केटमधून हिरवा व पिवळा बेदाणा चांगल्या किमतीला विकला जातो. तसेच काळ्या बेदाण्याचीही विक्री होते. तिन्ही बेदाण्यांचे मागील काही वर्षांच्या तुलनेत दर पुढील काही महिन्यांत वाढलेले पाहायला मिळू शकतात. कारण यावर्षी ऑक्टोबर, नोव्हेंबर छाटणी घेतलेल्या द्राक्षांपैकी किती द्राक्षे मार्केटिंगसाठी जाणार व किती द्राक्षे बेदाणे निर्मितीकडे वळणार, याचाही अंदाज नाही. शिवाय मागील तीन वर्षांत द्राक्षबागा शेतकऱ्यांनी विविध कारणांमुळे काढून टाकल्यामुळे जिल्ह्याच्या द्राक्ष क्षेत्रात तीस ते पन्नास टक्के तालुकानिहाय घट झाली आहे. या घटीचा परिणाम दीर्घकालीन पुढे होऊ शकतो. परिणामी बेदाण्याच्या मागणीपेक्षा आवक कमी राहिल्यास बेदाण्याचे दर वाढण्यास मोठे कारण ठरू शकेल. बेदाणे निर्मिती खर्चही वाढला आहे. त्यामुळे बेदाणे उत्पादक अपेक्षित किंमत आल्याशिवाय मार्केटमध्ये विक्री करणार नाहीत. आवक कमी, मागणी जास्त आणि उत्पादन खर्च जास्त या सर्व कारणांमुळे आता बेदाणा उत्पादकांना दर चांगले मिळतील आणि पुन्हा दिवस पालटायला सुरुवात होईल, असे आशादायी चित्र सध्या तरी निर्माण झाले आहे.