Maharashtra Politics |
सांगली : बातमी बरं बोलत असते; पण तेच खरं असतं, असं नाही. तर बातमी काय आहे? बातमी आहे, सांगली जिल्ह्यातील काही नेतेमंडळी अजित पवार राष्ट्रवादी गटामध्ये गेल्याची. कोण कोण गेले? माजी आमदार विलासराव जगताप (जत), माजी मंत्री शिवाजीराव नाईक (शिराळा), माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख (खानापूर), माजी मंत्री अजितराव घोरपडे (कवठेमहांकाळ), तमन्नगौडा रवी पाटील (जत) इत्यादी इत्यादी. त्यांनी अनेक पक्षांच्या मांडवाखालून यापूर्वी प्रवास केलेला आहे. मग आता पुन्हा कपडे का बदलले? बातमी म्हणते, मतदारसंघाच्या चौफेर विकासासाठी. हसताय ना? हसलेच पाहिजे.
तमन्नगौडा रवी पाटील वगळता अन्य सर्व नेते मंडळींच्या आयुष्याचा उत्तरार्ध सुरू झालेला आहे. पंधरा-वीस-पंचवीस वर्षे ही माणसे राजकारणात होती, अजूनही राहू इच्छितात. त्यात गैर ते काय? त्यांनी नानाविध पदे उपभोगलेली आहेत. आता त्यांना फक्त मतदारसंघाचा चौफेर विकास करावयाचा आहे. मग सत्ता भोगलेल्या प्रदीर्घ कालखंडात त्यांनी नेमके केले काय? या कालखंडात जे काही केले, ते टिकवण्यासाठी, त्याचा विस्तार करण्यासाठी, त्याचे अर्थकारण जपण्यासाठी, वाढविण्यासाठी, राजकीय वारसदाराचे स्थान बळकट करण्यासाठी, गतीने आणि आक्रमकतेने वाढणार्या विरोधकाला (भाजप) विरोध करण्यासाठी त्यांनी आता कपडे नव्हे, पक्ष बदलला.
सर्वांचा प्रवास अर्थातच काँग्रेसपासून सुरू झाला. त्यानंतर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास झालेला आहे. शेतकरी कामगार पक्ष, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, जनता दल आदींनी चौफेर विकासाची गॅरंटी दिली असती आणि ते जर सत्तेत असते, तर ही सर्व मंडळी या पक्षांच्या सत्तेच्या गुळाच्या ढेपेला पटकन चिकटलीही असती.
या प्रत्येक नेत्याची एक गोष्ट आहे. प्रत्येक गोष्ट सांगायची म्हणजे लई लांबडे पुराण म्हणजे गोष्ट छोटी डोंगराएवढी होईल. एकाला नवीन साखर कारखाना काढायचा आहे. लवकरच काढणार... लवकरच काढणार, असे तो बारा-पंधरा वर्षे म्हणतोय. अनेक निवडणुकीत त्याने ही आश्वासने दिली. जागा तयार आहे म्हणे, बघू कधी कारखाना उभा राहतोय ते. दरम्यान, त्याचा मुलगाही मोठा झाला. त्याचे राजकीय बस्तान बसवायचे आहे. दुसर्या नेत्याचा साखर कारखाना बारा वर्षे होऊन गेले, तरी बंदच आहे. तो चालू करायचा आहे, त्यामुळे बदलला पक्ष. त्याचाही मुलगा झालाय मोठा. त्याचा भाऊ आहे भाजपात. हसताय ना?, हसायलाच पाहिजे. तिसर्या नेत्याचे दोन उद्योग बंद आहेत, एक उद्योग दुसर्याला चालवायला दिलाय. त्यालाही आर्थिक घडी दुरुस्त करायची आहे. त्याच्याही एका मुलाच्या राजकीय करिअरचा प्रश्न आहे. चौथ्या नेत्याला स्वतःला आमदार व्हायची इच्छा आहे, सरकार दरबारी कोठे वर्णी लागली, तर उत्तमच. नातवाला राजकीय मैदानात खेळवण्याची त्याची इच्छा आहे. तात्पर्य काय, तर सत्तेच्या खुर्चीवरून जो खेळ मांडला, तो पुन्हा मांडायचा आहे.
ही मंडळी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये गेली आहे, असे बातमी सांगते. खरे तर ही मंडळी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे द्रोण लावण्यासाठी गेलेली आहे. अजित पवार यांच्या जागी रामदास आठवले जरी अर्थमंत्री असते, तरी ते आठवले यांच्याकडे गेले असते. पक्ष म्हणून, विचारसरणी म्हणून कपडे बदललेले नाहीत. अर्थ प्राप्तीसाठी अर्थमंत्री यांच्याकडे वेटिंग रूमला जाऊन बसलेत, इतकेच. स्थानिक निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अजित पवार गटात नव्याने दाखल झालेली मंडळी काय ताकद दाखवते, हे पाहावे लागेल. काही जागा या नेत्यांच्यामुळे मिळाल्या, तर ग्रामस्तरावर अजित पवार गटाचा प्रारंभ होऊ शकतो.
या सर्व नेत्यांची वैयक्तिक अशी काही एक ताकद आहे. ती जबरदस्त आहे, असे म्हणता येत नाही. एकेकाळी ती जबरदस्त होती, प्रभावशाली होती, हे मान्य करावे लागेल. आता चित्र बदलले आहे. मुंबईतही, दिल्लीतही आणि गल्लीतही. त्यामुळे गट शाबूत राखण्यासाठी सर्वच नेते मंडळी धडपडत असतात. गट राखला, तर कार्यकर्तेही राखले जातात. अर्थसत्ता, राजसत्ता यांच्या जवळपास असले की, कार्यकर्त्यांना सांभाळणेही सुलभ जाते. त्यात तडजोडीच्या राजकारणात तोड पाणी करताना, गट आणि गटाची ताकद कामी येते.
शरद पवार आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या बातम्या आहेत. असे झाले तर अजित पवार गटात दाखल झालेल्या या नेतेमंडळींचे भवितव्य काय? या प्रश्नावर तर्क लढवून उत्तराशी खेळावे लागते. तूर्त इतकेच आपल्या हाती आहे.